सिद्धेश्वर कुरोलीच्या विठोबा-बिरोबा भाकणूक व धार्मिक विधी रद्द

 


स्थैर्य, कातरखटाव, दि. १८ : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सिध्देश्वर कुरोली (ता. खटाव) येथील ताकपीठ माळावरील विठोबा-बिरोबा देवस्थानने नवरात्र कालावधीतील सर्व धार्मिक विधी बंद ठेवले आहेत. त्याचबरोबर दरवर्षी दसर्‍यादिवशी होणारी वार्षिक भाकणूकही रद्द करण्यात आल्याची माहिती विश्वस्त समितीच्या सदस्यांनी दिली.


याबाबत अधिक माहिती अशी, कुरोली येथील विठोबा-बिरोबा देवस्थान महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. दरवर्षी महाशिवरात्रीनंतर पाचव्या दिवशी या देवस्थानची वार्षिक यात्रा असते. पहिल्या दिवशी भाकणूक असते. त्यानंतर नवरात्र उत्सवाच्या काळात नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम तसेच दसर्‍या दिवशी कुरोली व वाकेश्वर या दोन गांवच्या शिवेवर असणार्‍या येरळा नदीपात्रात भाकणूकीचे आयोजन करण्यात येत असते. या भाकणूकीत देवाचे पुजारी रब्बी पिकांची परस्थिती, शेळ्या, मेंढ्या, गुरे, ढोरे व माणसांचे आरोग्य, पर्जन्यस्थिती या विषयी भाकित करत असतात. या भाकणूकीसाठी परीसरातील ग्रामस्थांसह राज्यभरात विखुरलेले भाविक हजेरी लावतात. याशिवाय नवरात्रात देवालयात येणार्‍या भक्तांचीही संख्या मोठी असते. लोकांच्या गर्दीमुळे कोरोना संक्रमनाचा प्रादुर्भाव होवू शकतो. त्यामुळे शासनाच्या ध्येयधोरणानुसार भाकणूक तसेच इतर सर्व धार्मिक, सामाजिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय विश्वस्त समितीने एकमताने घेतला आहे.Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya