जोशी हॉस्पिटलची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद : प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप

 

स्थैर्य, फलटण दि.१४: डॉ.प्रसाद जोशी व सौ.प्राची जोशी हे खाजगी आस्थापना असूनसुद्धा विविध उपक्रमांच्या माध्यमातून जोशी हॉस्पिटलच्या माध्यमातून जपत असलेली सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार फलटण प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांनी काढले.

येथील जोशी हॉस्पिटल प्रा.लि;च्यावतीने जागतिक अस्थीरोग दिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोरोना विशेष स्मरणिकेचे प्रकाशन डॉ.शिवाजीराव जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.अमिता गावडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, फलटण शहर पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, पोलीस उपनिरीक्षक भंडारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ.जगताप पुढे म्हणाले, जोशी हॉस्पिटलमार्फत प्रतिवर्षी जागतिक अस्थीरोग दिनानिमित्त मोठ्या स्वरुपात कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा दर्जेदार व समाजोपयोगी उपक्रमांची समाजात आवश्यकता असून जोशी दांपत्याकडून इथूपपुढेही हे कार्य असेच सुरु राहो, अशी सदिच्छाही डॉ.जगताप यांनी यावेळी व्यक्त केली. 

प्रसाद काटकर म्हणाले, डॉ.प्रसाद जोशी यांचे आरोग्यविषयक लेख अतिशय माहितीपूर्ण असून साध्या व सोप्या भाषेमुळे ते वाचकांना भावतात. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त आरोग्यविषयक उपक्रम राबवता आला नसला तरी कोरोना विषयक माहितीपूर्ण स्मरणिका प्रकाशित करुन जनजागृतीचे काम त्यांनी निश्‍चितपणे केला आहे. 

डॉ.प्रसाद जोशी म्हणाले, जोशी हॉस्पिटल प्रा.लि; गेली 6 वर्षे 12 ऑक्टोबर हा जागतिक अस्थीरोग दिन सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांनी साजरा करीत असते. मात्र यंदाच्यावर्षी कोरोनामुळे कार्यक्रम रद्द करण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. पण उपक्रमात खंड नको म्हणून कोरोना विषयक स्मरणिका प्रकाशित करण्याचे आम्ही ठरवले. या उपक्रमात मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गटविकास अधिकारी डॉ.अमिता गावडे, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, डॉ.मेघना बर्वे, डॉ.अविनाश देशपांडे, डॉ.माधुरी दाणी, सौ.सुलक्षणा शहा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे नमूद करुन पुढील वर्षी आणखीन उत्तम रीतीने सामाजिक बांधीलकी जपून मोठ्ठा कार्यक्रम घेण्याचा मानस असल्याचेही डॉ.जोशी यांनी यावेळी आवर्जून सांगितले. 

दरम्यान, कार्यक्रमाचे औचित्य साधून फलटण प्रांत कार्यालय, फलटण नगरपालिका, फलटण पंचायत समिती व फलटण पोलीस स्टेशन यांना प्रत्येकी 5 पल्स ऑक्सीमीटर देण्यात आले.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya