प्रतिकुल परिस्थितीत मनाची खंबीरता जपण्यासाठी अध्यात्मिक पाठबळ आवश्यक

 

स्थैर्य, फलटण दि.२: कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य माणूस बेचैन झाला असून अशावेळी त्याला अध्यात्माच्या माध्यमातून मनःशांती मिळण्यासाठी राज्यातील ग्रामदेवता मंदिरे खुली करायला हवीत अशी मागणी येथील नगरसेवक अशोकराव जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

मानवी मनाच्या शांततेसाठी अध्यात्मच प्रभावी

हिंदुस्थानच्या भूमीत मानवी मनाची शांतता वृद्धिंगत करण्याचे सामर्थ्य अध्यात्मातील कीर्तन, प्रवचन, देवदर्शन वगैरे बाबीमध्ये असल्याचे देशातील यापूर्वीच्या अनेक प्रसंगात स्पष्ट झाले आहे, मात्र कोरोनाच्या संकटात शासनाने त्यावरच निर्बंध लादल्याने सर्वसामान्य माणूस अस्वस्थ परिस्थितीतून मनःशांती गमावून बसला असताना त्याला योग्य मार्ग दाखविण्यासाठी अध्यात्माशिवाय पर्याय नसल्याचे अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

रामायण, महाभारत व तत्सम मालिकांचा आधार

सार्वजनिक ठिकाणे, रस्ते किंवा अन्य ठिकाणची वाढती गर्दी कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट होताच शासन/प्रशासनाने अनेक उपाय योजना केल्या, त्यावेळी दूरदर्शनच्या काही वाहिन्यांवर लोकप्रिय ठरलेल्या व लोक त्यासाठी दूरदर्शन पाशी खिळून रहात असल्याचे लक्षात घेऊन सदर मालिका दूरदर्शनवर पुनप्रदर्शीत करण्यात आल्या, यावरुन या देशातील सर्वसामान्य माणूस श्रद्धाळू, भक्तीला प्राधान्य देणारा किंबहुना त्यासाठी वेळ काढणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे, तेंव्हा लोकांच्या समाधानासाठी मंदिरे व अध्यात्माची सर्व कवाडे खुली करावीत, त्यासाठी काही मर्यादा, निर्बंध जरुर घालावेत परंतू ते पूर्णतः बंद ठेवणे अयोग्य असल्याचे अशोकराव जाधव यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

वारकरी म्हणून मंदिरे खुली करण्याची मागणी

मंदिरे खुली करण्याची मागणी आपण लोकप्रतिनिधी अथवा एखाद्या पक्षाचा सदस्य म्हणून नव्हे तर संतांच्या भूमीतील वारकरी म्हणून करतो आहोत असे भावूक पत्र अशोकराव जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. 

अनलॉक मध्ये अध्यात्माची दखल नाही

महाराष्ट्र राज्यात अनलॉक ५ जाहीर झाला, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली, मात्र अद्याप मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. वास्तविक गेल्या सहा पेक्षा अधिक महिन्यांपासून भाविकांना देवाचे दर्शन झाले नाही, तेव्हा सरकारने किमान ग्रामपंचायत व नगर पालिका हद्दीतील ग्रामदेवता व परिसरातील लहान मंदिरे उघडण्यास सशर्त परवानगी द्यावी, संतांची भूमी असलेल्या या राज्यातील सर्वसामान्य भक्तावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे या पत्राद्वारे केली आहे.
Previous Post Next Post