धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीची तात्काळ अंमलबजावणी करा - फलटण तालुका धनगर समाज समन्वय समिती

धनगर समाजाच्या प्रमुख मागण्यांचे प्रांताधिकार्‍यांना दिले निवेदन

स्थैर्य, फलटण, दि.१: गेली ७० वर्षे धनगर समाजाला जाणीवपूर्वक अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवण्याचा पाप तत्कालीन महाराष्ट्र राज्य सरकार व भारत सरकारने केलेले आहे. 

घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर जी घटना लिहली त्या घटनेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमाती या कॅटेगिरी मध्ये समाविष्ट केले होते. मात्र ज्यावेळी घटनेची अंमलबजावणी करण्याची वेळ राज्य सरकारवर आली त्यावेळी तत्कालीन राज्य सरकारने धनगर धनगड असा भेद निर्माण करून धनगर समाजाला जाणीवपूर्वक अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. त्या वेळेपासून आजपर्यंत धनगर समाजाने अनेक वेळा सरकारकडे या मागणीसाठी पाठपुरावा केला आहे. तरीदेखील आजपर्यंत धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. मागील भारतीय जनता पक्षाच्या राज्य सरकारने न्यायालयामध्ये धनगर व धनगड हे एकच आहेत असे शपथ पत्र लिहून देखील दिले आहे. तरी आता महाविकास आघाडीच्या सरकारने तात्काळ आध्यादेश काढून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती द्याव्यात तसेच पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांना तात्काळ पदोन्नती देण्यात यावी व थांबविण्यात आलेली मेगा भरती तात्काळ सुरू करावी त्याचबरोबर एक मागील भाजपा राज्य सरकारने १००० कोटीचा निधी धनगर समाजाच्या उन्नतीसाठी जाहीर केलेला आहे व तसे आदेश देखील काढलेले आहेत. तो निधी तात्काळ वितरित करून जाहीर केलेल्या योजनेसाठी देण्यात यावा. अशा आशयाचे निवेदन आज फलटण तालुका धनगर समाज समन्वय समितीच्या वतीने फलटण उपविभागाचे प्रांताधिकारी श्री. शिवाजीराव जगताप यांना देण्यात आले यावेळी फलटण तालुका दूध संघाचे माजी चेअरमन तथा धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते प्रा. भिमदेव बुरुंगले पंचायत समितीचे माजी सभापती श्री. शंकराव माडकर, आस्था टाईम्सचे कार्यकारी संपादक श्री. दादासाहेब चोरमले प्रा. बाबासाहेब खरात, श्री. पोपटराव सोनवलकर, श्री. संदीप सोनवलकर,श्री. मोहनराव नरुटे, फलटण कोरेगाव मतदार संघाचे भाजपाचे प्रमुख श्री. बजरंग गावडे पंचायत समितीचे माजी सभापती श्री. रामभाऊ ढेकळे महाराष्ट्र केसरी पै. बापूराव लोखंडे, फलटण तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष पै. विष्णुपंत लोखंडे,‌ पै. आप्पासाहेब लोखंडे, पंचायत समितीचे माजी सभापती पै. मोहनराव लोखंडे इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
Previous Post Next Post