काळज ( ता . फलटण ) येथील दहा महिन्याच्या ओम भगत या चिमुकल्याची निर्दयपणे हत्या करणार्‍या नराधमाच्या अवघ्या दोन दिवसांत मुसक्या आवळणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी बुधवारी प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला

 

स्थैर्य, सातारा, दि.१५: काळज ( ता . फलटण ) येथील दहा महिन्याच्या ओम भगत या चिमुकल्याची निर्दयपणे हत्या करणार्‍या नराधमाच्या अवघ्या दोन दिवसांत मुसक्या आवळणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी बुधवारी प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला. नव्याने रुजू झालेल्या पोलीस अधीक्षकांनी शाबासकीची थाप पाठीवर टाकून कर्तव्यदक्ष पोलीसांना प्रोत्साहन दिले आहे. यामुळे पोलीस दलाला आणखी चांगले काम करण्यास आणखी बळ मिळाले आहे. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

काळज येथील त्रिंबक भगत यांचा लहान मुलगा ओम (वय 10 महिने) याचे घरातून अपहरण झाल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार भादंवि कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, तत्कालीन पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी घटनास्थळी तत्काळ भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. पोलिसांची 11 पथके तयार करून तपास सुरू केला होता. तपास सुरू असतानाच पोलिसांना संशयिताविषयी माहिती मिळाली. ओमच्या आईवर शेजारच्या गावातील एका तरुणाचे एकतर्फी प्रेम होते. तो तिचा वारंवार पाठलाग करून त्रास देत असल्याचे समजल्यावर पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले. लोणंद पोलीस ठाण्यात त्याची चौकशी केली असता, सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. तपास पथकाने प्रश्‍नांचा भडीमार केल्यावर त्याने ओमचे अपहरण करून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याने फलटण व परिसरातील तणाव निवळण्यास मदत झाली होती.

त्यामुळे या कारवाईत सहभाग घेतलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, लोणंदचे सपोनि संतोष चौधरी, पुसेगावचे सपोनि विश्‍वजित घोडके, सपोनि नीलकंठ राठोड, उत्तम भापकर, भावीकट्टी, पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्‍हाड, पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, हवालदार महेश सपकाळ, तानाजी माने, शरद बेबले, जितेंद्र शिंदे, प्रवीण फडतरे, राजकुमार ननावरे, मुनीर मुल्ला, रवी वाघमारे, अजित कर्णे, अर्जुन शिरतोडे, निलेश काटकर, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, विशाल पवार, मयुर देशमुख, धिरज महाडीक, केतन शिंदे, वैभव सावंत, संजय जाधव, गणेश कचरे, गणेश घाडगे, महिला पोलीस मोना निकम, नतन बोडरे यांच्यासह या तपास मोहिमेत मोलाची कामगिरी बजावणार्‍या प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान केला. यामुळे अधिकार्‍यांना काम करण्यास आणखी बळ मिळाले.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya