मराठा आरक्षणासाठी १० ऑक्टोबरला पुकारलेला ‘महाराष्ट्र बंद’ मागे

 

स्थैर्य, मुंबई, दि.१०: मराठा आरक्षणाला सर्वोच्य न्यायालयाने स्थगिती दिल्याचा निषेध करत आरक्षणाच्या मागणीसाठी विविध मराठा संघटनांच्या वतीने १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. मात्र सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने हा बंद मागे घेत असल्याची माहिती मराठा सकल महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या प्रतिनिधिंनी या विषयावर सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतरच बंद मागे घेण्यात येत असल्याची घोषणा सुरेश पाटील यांनी केली.

सह्याद्री अतिथीगृहावर गुरुवारी रात्री उशीरा मराठा समाजाचे प्रतिनिधींसोबत मुख्यंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. याचबरोबर मंत्री अशोक चव्हाण, अनिल परब, विजय वडेट्टीवार यांनीही या बैठकीला उपस्थिती लावली होती. रात्री उशीरा आमची बैठक पार पडली. सरकारने आमच्या अनेक मागण्या मान्य केल्याने आम्ही उद्याचा बंद मागे घेतोय, असं सुरेश पाटील यांनी सांगितलं आहे.

मराठा समाजाला देऊ केलेल्या आरक्षणाला सर्वोच्य न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली आहे. या निकालाचे पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कोल्हापुरात २३ सप्टेंबर रोजी मराठा गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला. या परिषदेला राज्यातील अनेक मराठा संघटनांचे नेते आणि प्रतिनिधींची उपस्थिती होती. यावेळी १५ ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्याबरोबरच केंद्र सरकारच्या आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा लाभ समाजाला देण्यासाठी अध्यादेश काढावा. महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणा-या मेगा नोकर भरतीला स्थगिती देण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya