मल्हारपेठ-पंढरपूर राज्य महामार्गावरील पूल पुन्हा एकदा वाहून गेलास्थैर्य, सातारा, दि. १६ : मायणी व परिसरात पावसाचा जोर वाढल्याने चाँद नदीला वाढलेल्या पाण्याच्या दाबाने मल्हारपेठ-पंढरपूर या राज्य महामार्गावरील भवानीदेवी मंदिर परिसरालगतचा कच्चा पूल पुन्हा एकदा वाहून गेला.  मध्यरात्री जोरदार पाण्याच्या दाबाने हा पूल वाहून गेला असून कलेढोण, म्हसवड, पंढरपूरकडे जाणारा वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे. या वादळी पावसाने मायणीकरांची चांगलीच दैना उडवली आहे.


एक तपाहून अधिक काळानंतर चाँद नदीला आलेला महापूर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. दोन दिवस मायणी, कलेढोण परिसरात जोरदार पाऊस पडल्याने मायणी येथील चाँद नदीवरील भवानीदेवी मंदिर परिसर येथील कच्चा पर्यायी पूल, मुख्य बाजारपेठ व चांदणी चौक या भागाला जोडणारा पूल व लक्ष्मीनगरकडे जाणार पूल हे तिन्ही पूल अनेक वर्षातून पाण्याखाली गेल्याने लोकांचा दळणवळणाचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. काही दिवसांपूर्वीच मल्हारपेठ -पंढरपूर रस्त्यावरील मुख्य पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी मातीचा भराव पूल संबंधित ठेकेदाराने तयार केला होता; परंतु तो वाहून गेल्याने तीन दिवस हा पूल वाहतुकीला बंद झाला होता. तो पुन्हा मोठ्या पाइप टाकून सुरू करण्यात आला होता.  पुलाच्या कामाचे अयोग्य नियोजन यामुळे पुन्हा हा पूल मध्यरात्री वाहून गेला. वारंवार राज्य महामार्गावरील खंडित होणारी वाहतूक यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये असे आवाहन स्थानिक प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya