ठाणे येऊर यथील वनधिकाऱ्यांचा प्रताप विधानसभेत मांडणार – आमदार विनोद निकोले


स्थैर्य, ठाणे, दि.२४: वर्षानुवर्षे येऊरच्या डोंगरावर पारंपरिक पद्धतीने भातशेती करणाऱ्या आदिवासींची कापणीला तयार असलेली भात, तूर, नागली ही सर्व पिके त्यांना न कळवता येऊरच्या वनाधिकाऱ्यांनी चोरासारखी अक्षरशः उध्वस्त करून लुटून नेली. कारण काय, तर म्हणे ती अनधिकृत होती. आणि गेले 7 महिने या क्षेत्रात झालेले ढाबे, लॉन्स, बंगले अशी शेकडो बेकायदेशीर बांधकामे मात्र अधिकृत आणि पर्यावरण पूरक आहे काय ? असा संतप्त सवाल करत ठाणे येऊर यथील वनधिकाऱ्यांचा हा प्रताप विधानसभेत मांडणार असल्याची घोषणा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले यांनी केली आहे.यावेळी आ. निकोले म्हणाले की, आम्ही आदिवासी विकास मंत्री, वन मंत्री, राज्यमंत्री, प्रधान सचिव यांना ई - मेल द्वारे दि. 30 सप्टेंबर रोजी पत्र लिहून आदिवासी बंधू आणि भगिनींवरील वन गुन्ह्यातील खोटे आरोप मागे घ्यावे म्हणून निवेदन दिले होते. त्यात कोरोना कोविड - 19 ही महामारी आणि लॉकडाऊनने आधीच गरिबांचे कंबरडे मोडले आहे. काम बंद त्यामुळे कमाई बंद. घरात खाणारी तोंडे मात्र कायम. त्यांचे पोट भरायचे कसे ? आजवर डोंगरावरील पीक आणि मजुरी यातून कसेबसे घर चालवणाऱ्या या गरीब आदिवासींची या वर्षी भात शेती आणि त्याबरोबर घेता येणारी भाजी पाला इ. जुजबी पिके यावर सर्व मदार होती. वनाधिकारी राब करायला सुरुवात केल्यापासूनच त्यांना त्रास देऊ लागले. मात्र त्यांच्या सर्व मागण्यांची पूर्तता, तारखेला हजेरी, कागदपत्रे इ. देऊनही या निर्दयी अधिकाऱ्यांनी अखेर आपला माज दाखवत या गरिबांच्या हाता-तोंडाशी आलेला घासच हिसकावून घेतला. कापणीला तयार असलेली पिके अक्षरशः उध्वस्त करून लुटून नेली. हे बघणाऱ्या एका गरीब आदिवासी बांधवाने निरोप पोहोचवू नये म्हणून त्याला थेट ताब्यात घेऊन त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. आणि पीक कापून होईपर्यत त्याला बांधून ठेवले. बातमी कळताच धावत आलेल्या आदिवासी महिला असा तोंडचा घास हिसकवल्याचे दिसताच पोटचे पोर गेल्यासारख्या अक्षरशः धाय मोकलून रडू लागल्या. त्यांनी आता जगायचे कसे ? कोण देणार याचे उत्तर ? ते उत्तर मागण्यासाठी आणि या मस्तवाल वनाधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी सर्व शेतकरी, पर्यावरणप्रेमी व कार्यकर्ते हे 23 ऑक्टोबरला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यात ठाणे शहर आणि शहापूर तालुका येथून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली 1000 शेतकऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तासभर जोरदार रस्ता रोको आंदोलन केले. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी किसान सभेच्या प्रतिनिधीमंडळाला सविस्तर चर्चा करण्यासाठी आमंत्रण दिल्यावरच रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले आणि शेतकऱ्यांची ठाणे विश्रामगृहासमोर मोठी सभा झाली.

सदरच्या वेळी आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कॉ. अशोक ढवळे, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष कॉ. किसन गुजर, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस कॉ. मरियम ढवळे, किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. बारक्या मांगात, डहाणू विधानसभेचे आमदार कॉ. विनोद निकोले, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिव कॉ. प्राची हातिवलेकर, किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ. किरण गहला, कॉ. चंद्रकांत गोरखना, भरत वळंबा व कृष्णा भावर, तसेच सुनील करपट, नितीन काकरा, चंदू धांगडा, दत्तू खराड, किशोर खराड, पी. के. लाली, सुनील चव्हाण, भास्कर म्हसे, डॉ. आदित्य अहिरे, निकिता काकरा, कमल वळंबा यांनी केले.