राज्यपालांचं पत्र धक्कादायक; पवारांनी थेट PM मोदींकडे केली तक्रार

 


स्थैर्य, मुंबई, दि.१४: राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात 'लेटरवॉर' भडकलं असताना महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेतला आहे. 

राज्यपाल कोश्यारी यांचं पत्र संविधानाची चौकट मोडणारं असल्याचं परखड मत व्यक्त करतानाच धार्मिक स्थळे उघडली नाहीत म्हणून 'सेक्युलर' ठरवून अवहेलना करणार का? असा सवालच शरद पवार यांनी या पत्रात विचारला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात ज्या भाषेचा प्रयोग केला आहे तो धक्कादायक आहे. राज्यपालांना अशी भाषा शोभत नाही, अशी तक्रारच शरद पवार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत मात्र धार्मिक स्थळे अद्याप खुली करण्यात आलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर आज भाजपने राज्यव्यापी आंदोलन केलं. एकीकडे हे आंदोलन सुरू असतानाच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून धार्मिक स्थळे खुली करण्याची सूचना केली आणि त्यासोबतच मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाचीही आठवण करून दिली. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगेचच ठाकरी भाषेत उत्तर दिलं असताना शरद पवार यांनी या सगळ्या घटनाक्रमाकडे थेट पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे.

करोना रोखण्यासाठी 'दो गज की दूरी' राखण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने करत आहेत. त्याचा उल्लेख करत व राज्यातील करोना स्थितीवर बोट ठेवत शरद पवार यांनी राज्यपालांच्या पत्रावर आश्चर्य व चिंता व्यक्त केली. राज्यपालांनी धार्मिक स्थळे सुरू करण्याची सूचना केली असली तरी वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी. महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, पंढरपूरचं विठ्ठल मंदिर, शिर्डीतील साईबाबा मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी नेहमीच असते. ही बाब लक्षात घेता या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग राखणं शक्य होणार नाही, याकडे पवार यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले. राज्यातील धार्मिक स्थळे टप्प्याटप्प्याने उघडण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यावर राज्यपालांचीही स्वतंत्र भूमिका असू शकते. ती त्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडायला हवी यात दुमत असू शकत नाही. मात्र त्यांनी लिहिलेल्या पत्रात जी भाषा वापरण्यात आली आहे ती धक्कादायक आहे. संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा भाषेचा प्रयोग करू नये, असे मतही पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना राज्यपाल पत्र लिहितात व ते सर्वात आधी ते पत्र मीडियातून जाहीर होतं ही बाबही गंभीर असल्याचे पवार यांनी नमूद केले. 

राज्यपालांनी 'सेक्युलर' या शब्दाचा प्रयोग करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. त्यावरही पवार यांनी बोट ठेवलं आहे. संविधानाच्या प्रस्तावनेतच 'सेक्युलर' (धर्मनिरपेक्ष) या शब्दाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे व सर्व धर्म येथे समान आहेत, असे नमूद करताना राज्यपालांनी कशी घटनेची चौकट ओलांडली त्याकडे पवारांनी लक्ष वेधले. दुर्दैवाने राज्यपालांनी जे पत्र लिहिलं आहे ते एका मुख्यमंत्र्यांना नाही तर एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला लिहिलं असंच वाटतं, असे परखड मत पवार यांनी मांडले. राज्यपालांच्या पत्रातील काही दाखलेही पवार यांनी आपल्या पत्रात दिले आहेत.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya