नवीन औद्योगिक प्रकल्पामुळे माण च्या शेनखडीचे सोन होणार - बजरंग कदम

 

शिरतांव येथील शेनखडी येथे उभारण्यात येत असलेल्या औद्योगिक प्रकल्पाचे भुमीपुजन करताना 

स्थैर्य, म्हसवड दि. ५ : कायम दुष्काळी असा शिक्का असलेल्या माण तालुक्यात आजवर एक ही मोठा औद्योगिक प्रकल्प उभा न राहिल्याने माण तालुक्यातील बेरोजगारी कायम राहिली असुन येथील शेतकर्यांनाही कायम निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबुन रहावे लागले आहे, मात्र यापुढे हे चित्र निश्चितपणे बदलणार असुन युवकांच्या स्वप्नातील माण तालुका प्रत्यक्षात उतरण्यास सुरुवात झाली आहे, त्या बदलाचा शुभारंभ आज माण तालुक्यातील शिरतांव येथील सोनखडी येथुन होत असुन येथे उभारणार्या नव्या औद्योगिक प्रकल्पामुळे शेनखडीसह संपूर्ण माण तालुक्याचे सोन झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास एन. एम. आर. एल. ( अंबरनाथ ) चे डी.आर.डी.ओ. बजरंग नाना कदम यांनी व्यक्त केला.


शिरतांव ता. माण येथील शेनखडी येथे एम.सी.एल. व प्रभुरत्न प्रोड्युसर कंपनी लि. आणि प्रभुरत्न बायोफ्युअल इंडिया प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येत असलेल्या औद्योगिक प्रकल्पाच्या भुमीपुजनाच्या वेळी ते बोलत होते, यावेळी म्हसवडचे नगराध्यक्ष तुषार विरकर, कंपनीचे प्रमुख दिपक रामचंद्र कोळपे, श्रावण माने ( मुंबई ), शैलेश म्हात्रे (रोहा ), दौडंचे उद्योजक गिरमकर, संतोष सोनवलकर, मयुर ठोंबरे, किशोर राठोड, अरुण सावंत, शिवाजीराव शिंदे, डॉ.विवेक माने, डॉ.चंद्रकांत साबळे, डॉ.हेमा पिंजारी, अँड.विजय काळेल, अरुण यादव, लुबाळ मँडम, मोहन कदम आदी प्रमुख उपस्थित होते.


यावेळी पुढे बोलताना कदम म्हणाले की सदर प्रकल्पामुळे संपूर्ण माण तालुका हा इंधनाच्या बाबतीत स्वयंपुर्ण होणार असुन याठिकाणी तयार होणार्या इंधनाचा वापर हा वाहनांबरोबर घरगुती स्वयंपाकासाठी लागणार्या इंधनासाठीही होणार आहे. सध्याच्या पेट्रोल, डिझेल, खनिज, सिएनजी, एल.पी.जी. यासारख्या इंधनाला येथील इंधन हे १०० टक्के पर्याय इंधन राहणार असुन औद्योगिक क्षेत्रासाठी लागणार्या अंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या इंधनाची निर्मीती याठिकाणी केली जाणार आहे, त्यामुळे संपूर्ण माण तालुका हा प्रदुषण मुक्त असा होणार आहे.


यावेळी माण तालुका उद्योजक दिपक कोळपे बोलताना म्हणाले की सदर प्रकल्पात निर्माण होणार्या इंधनासाठी लागणारा कच्चा माल हा शेतातच निर्माण होणार असल्याने शेतकर्यांना याचा मोठा फायदा होणार आहे, यासाठी कर्जमुक्त अशा करार शेतीचा फॉर्म्युला अंमलात आणला जाणार असुन यामुळे शेतकर्यांना हमखास शाश्वत व चांगले उत्पन्न मिळणार आहे, तालुक्यातील सर्व शेतकर्यांच्या समृध्दीसाठीच सदरचा हा प्रकल्प उभारण्याचा आम्ही घाट घातला असुन सदर प्रकल्पामुळे २ हजार ते १० हजार हेक्टर पर्यंत शेती करार करणे शक्य होणार आहे. सदर प्रकल्पामुळे २ हजार प्रत्यक्ष रोजगार तर १५ ते २० हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मीती होणार आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर तालुक्यामध्ये रोजगार निर्मीती झाल्यावर तालुक्यातील बेरोजगारी कमी होईल याशिवाय येथील स्थलांतरही कायमचे थांबणार आहे. याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन प्रत्येकाला ऑनलाइन दिले जाणार असुन युवकांनी यासाठी एक पाऊल पुढे यावे असे ही आवाहन शेवटी कोळपे यांनी केले.‌


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवाजीराव यादव यांनी केले तर उपस्थितांचे आभार तुकाराम लुबाळ यांनी मानले.

म्हसवड येथे कार्यालयाचे उद्घाटन

सदर प्रकल्प हा जरी शिरतांव गावच्या हद्दीतील सोनखडी येथे उभारला जात असला तरी सदर प्रकल्पाचे कार्यालय हे म्हसवड शहरात उभारण्यात आले असुन सदर कार्यालयाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.


माण तालुक्यातील पहिला प्रकल्प 

एम.सी.एल. अंतर्गत संपूर्ण देशात १ हजार प्रकल्प उभारले जात असुन माण तालुक्यात उभारला जाणारा हा प्रकल्प त्यापैकी एक असल्याचे संचालक मंडळाचे प्रकाश मोरे, अरुण होनमाने, राम शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.


ग्रामउद्योजकांची नियुक्ती करणार 

सदर प्रकल्प उभारण्यासाठी जास्तीत जास्त शेतकर्यांनी सहभागी व्हावे, तरुणांनी नवा उद्योग सुरु करावा याकरीता कंपनीच्या वतीने गावांगावात ग्रामउद्योजकांची नियुक्ति केली जात असुन अरुण यादव, वैभव यादव - पळसावडे, शोभा विरकर,- शिरतांव, राजु हाके - धुळदेव, व संदिप चव्हाण - देवापुर आदी जणांची ग्रामउद्योजक म्हणुन नियुक्ती करण्यात आली.