छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील उभारण्यात आलेल्या सुसज्ज कोविड हॉस्पीटलचे ऑनलाईन उद्घाटन शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले

 


स्थैर्य, सातारा, दि.९: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेल्या वास्तूमध्ये सातार्‍यात भव्य असे कोवीड हॉस्पिटल सुरू होत आहे. आपल्या नावे असलेल्या वास्तूचा रयतेसाठी उपयोग असल्याने साक्षात छ. शिवरायांनाही अभिमान वाटेल, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. दरम्यान, अजितदादा पवार यांनी लोकांचे जीव वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य राहिल, उपचाराविना कोणाचा बळी जावू नये. जंबो हॉस्पिटलमध्ये जशी अद्ययावत यंत्रणेची माहिती दिली जाते तशी ती योग्यरित्या चालवण्याचीही जबाबदारी निश्‍चित करावी, अशा सूचना दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील उभारण्यात आलेल्या सुसज्ज कोविड हॉस्पीटलचे ऑनलाईन उद्घाटन शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. महेश शिंदे, आ. दीपक चव्हाण, आ. जयकुमार गोरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखरसिंह, जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांच्यासह लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळ, यंत्रणेची उणीव भासत असतानाच रुग्णसंख्या वाढत असल्याने बिकट परिस्थिती निर्माण होवू लागली होती. जिल्ह्याच्या ठिकाणी जंबो कोव्हीड सेंटरची उभारणी गरजेची होती. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे असलेल्या या वास्तूमध्ये रयतेसाठी कोवीड हॉस्पिटलची उभारणी सुरू होत आहे. याचा रयतेचे राजे छ. शिवरायांनाही अभिमान वाटेल. सध्या कोवीड केसेस कमी येवू लागल्या आहेत, जंबो हॉस्पिटलची उभारणीही झाली आहे. म्हणजे धोका टळला नाही. जेथे कोरोना केसेस कमी झाल्या तिथे कालांतराने दुसरी लाट आली असल्याची जगभरात उदाहरणे आहेत. त्यामुळे लोकांनी लस येईपर्यंत मास्कचा वापर, सुरक्षित आंतर आणि हात धुणे या त्रिसुत्रीचा अवलंब अत्यंत गरजेचा असल्याचे त्यांनी सांगितले. 


अजितदादा पवार म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या नाव असलेल्या या वास्तूमध्ये रयतेसाठी कोवीड रुग्णालय सुरू होत आहे. कोवीड रुग्णांचे रक्षण करण्यासाठी, त्यांचा जीव वाचवण्यासाठी हे उपयोगी पडणार आहे. तथापि, येथे येण्याची वेळ कोणावर येऊ नये, या शुभेच्छा. जिल्ह्याच्या ठिकाणी चांगले कोविड हॉस्पिटल गरजेचे आहे. या हॉस्पिटलमध्ये 234 ऑक्सिजन बेड व 52 आयसीयु बेड आहेत. डायलिसीस असणार्‍या रुग्णांना रुग्णालये घेत नाहीत अशा रुग्णांसाठीही 4 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ही माहिती अनेकवेळा सांगण्यात आली आहे. तथापि, हे अद्ययावत यंत्रणा योग्य प्रकारे चालवण्याची जबाबदारी कोणावर आहे तेही लोकांना सांगितले पाहिजे. जसे कार्पोरेट कंपनीत सीईओ असतो, वैद्यकीय महाविद्यालयात डीन असतात तसेच कोव्हीड हॉस्पिटलमध्ये जबाबदारी कोणाची ते निश्‍चित व्हावे. याठिकाणी किती डॉक्टर्स व नर्सेस व वैद्यकीय स्टाफ आहे, त्याची माहिती लोकांसमोर यावी. जर याठिकाणी चांगल्या पद्धतीने काम झाले तर त्याचेही कौतूक केले पाहिजे. त्याचबरोबर जर योग्यरितीने काम होत नसेल तर त्यासाठी जाब कोणाला विचारायचा, त्याचीही जबाबदारी निश्‍चित करावी. याठिकाणी उपचाराविना मृत्यू झाला, असे घडता कामा नये. लोकांचे जीव वाचवायला सर्वोच प्राधान्य राहिल, कोवीडसाठी पुणे विभागासाठी 151 कोटी 46 लाखांचा निधी देण्यात आला आहे. त्यापैकी सातारा जिल्ह्यासाठी सातारा 45 कोटी 39 लाख दिले असल्याची माहिती अजितदादांनी दिली. आार्थिक संकट आहे पण कोरोना संकटावर मात करण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही अजितदादा पवार यांनी दिली. 
आरोग्य मंत्री अजित टोपे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्य मंत्री शंभुराज देसाई, ना. शंभुराज देसाई यांची भाषणे झाली.


विविध साथीच्या रोगाबरोबर आपण राहिला शिकलो तशीच काळजी घेऊन कोरोना बरोबर राहू या, लस येईल तेंव्हा येईल आपण हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या पाळून यावर विजय मिळवू असा आशावाद विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्ती केला. 

हॉस्पिटल सुरु होईल, सर्व साधनांची पूर्ततापण होईल पण डॉक्टर आणि नर्सेस यांची सेवा अधिक गतीने होण्याची गरज असून मृत्यू दर कमी करण्याबरोबर अधिकाधिक ट्रेसिंग करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केले. कृष्णा मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटल मध्ये अजून ऑक्सिजनचे बेड वाढू शकतात, त्यासंस्थेला सांगून ती क्षमता जिल्ह्यासाठी महत्वाची ठरेल असेही टोपे यांनी यावेळी सांगितले. 

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कोविड हॉस्पिटल उभं करण्यासाठी शासनाने अतिशय तत्परतेनी मदत केल्याचे सांगून गेल्या पाच महिन्यातील अनुभव लक्षात घेऊन हे हॉस्पिटल उभे केले. इथे डायलेसिसच्या व्यवस्थेचे चार बेडही उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविड हॉस्पिटल उभं करण्यासाठी तत्परतेनी परवानगी दिली. जिल्हाधिकारी आणि त्यांच्या टीमने अतिशय कमी काळात सुसज्ज असं हॉस्पिटल उभं केल्याचे सांगून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाच्या कामाचे केले. 

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या कोविड हॉस्पिटल उभारणी, त्यात कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी लागलेला निधी याची सविस्तर माहिती दिली. या नंतर कोविड हॉस्पिटलवर बनवलेली चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. 

यावेळी हे हॉस्पिटल उभं करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील आणि बाहेरील संस्था आणि व्यक्ती यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा याठिकाणी गौरव करण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी आभार मानले.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya