विंग परिसरातील पिकांत डुकरांचा धुडगूस

 


स्थैर्य, कराड, दि. १० : कराड तालुक्यातील विंग परिसरात काढणीला आलेल्या पिकांना आता रानटी डुकरांनी लक्ष्य केले आहे. विशेषतः येथील डोंगरपायथा परिसरात उभ्या पिकात कळपा-कळपाने त्यांचा धुडगूस सुरू आहे. रातोरात पिके फस्त होऊ लागल्याने उत्पादक हवालदिल झाले आहेत. तोंडचा घास हिरावून नेल्यासारखी स्थिती उत्पादकांची झाली आहे.


आगाशिव पायथा परिसरात आबासाहेब विठ्ठल खबाले, रामदास खबाले, हिंमत खबाले, अधिक खबाले आदी उत्पादकांच्या ज्वारीचे नुकसान त्यात झाले आहे. रात्रीचे नुकसान सकाळी निदर्शनास येत असल्याने संबंधित उत्पादकांची अवस्था केविलवाणी झाली आहे. दाद कोणाकडे मागायची, हा प्रश्‍न त्यांच्या-समोर आहे. वन विभागाकडून अपेक्षित नुकसान भरपाई मिळत नसल्याने इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती उत्पादकांची आहे. नुकसानीत रानटी डुकरांसह मोकाट गाई व साळिंदर आदी वन्यप्राण्यांचा समावेश आहे. आगाशिव व विठ्ठल डोंगरपायथा परिसरातील उभ्या पिकांना लक्ष्य त्यांनी केलेले आहे.

शिंदेवाडी परिसरातही त्यांचा वावर वाढला आहे. त्या परिसरातील उत्पादक नुकसानीमुळे अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. अतिशय काबाडकष्ट करून आणलेले पीक रातोरात नुकसानीत जाऊ लागल्याने उत्पादकांची डोकेदुखी त्यामुळे वाढली आहे. नुकसानग्रस्त काही उत्पादकांनी पंचनाम्यासाठी व नुकसान भरपाईसाठी वन विभागाकडे हेलपाटे सुरू केल्याचे चित्र येथे आहे.


दरम्यान, मी 60 गुंठ्यात ज्वारी पीक घेतले आहे. ते काढणीला आले होते. मात्र, शुक्रवारी रात्री डुकरांनी त्यात धुडगुस घातला आहे. तब्बल 25 गुंठ्यातील पीक खाऊन फस्त त्यांनी केल्यामुळे माझे मोठे नुकसान झाले आहे, असे आबासाहेब खबाले यांनी सांगितले.Previous Post Next Post