सासकल ओढ्याचे बदललेले पात्र व प्रवाह पूर्ववत करा : मागणी

 


स्थैर्य, दुधेबावी दि.२०: ओढ्यावरील पुलाचे काम पुराच्या पाण्यामुळे ओढ्याच्या पात्रात कोसळल्याने ओढ्याचे पात्र बदलून मोठ्या प्रमाणावरील पाण्याचा प्रवाह लगतच्या शेतातून सुरु असल्याने सदर शेतकर्‍याचे नुकसान रोखण्यासाठी संबंधीत शासन यंत्रणेने पुलाची दुरुस्ती तातडीने करावी अशी मागणी होत आहे.

भाडळी बु॥ मार्गे मुळीकवस्ती, चांगणवस्ती यांना जोडणार्‍या पुलाचे बांधकाम 2/3 वर्षांपूर्वी झाले असून नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने या ओढ्याला प्रचंड पूर आला त्यामध्ये पुलाचा पश्रि्चमेकडील भाग वाहुन गेला व उर्वरित काही भाग पात्रात पडल्याने ओढ्याचा प्रवाह बदलला आणि पुराचे प्रचंड पाणी शेजारच्या शेतकर्‍याचे शेतातून वेगाने वाहिल्याने सदर शेताच्या ताली, बांध फुटले आणि जमिनीची प्रचंड धूप झाल्याने या शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे.

भाडळी, सासकल, चांगणवस्ती वाहतूक पूर्ववत सुरु होण्यासाठी संबंधीत शासकीय यंत्रणेने सदर पुलाचे ओढ्याच्या पात्रात पडलेले बांधकाम काढून घेऊन ओढ्याचा प्रवाह पूर्ववत करावा अशी मागणी सदर शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.