केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी पॉझिटिव्ह, दिल्लीत आठवडे बाजार सुरू होणार; देशात आजपर्यंत 68.32 लाख रुग्ण तर 1.05 लाख मृत्यू

 


स्थैर्य, नवी दिल्ली, दि. ८: देशात मागील एका आठवड्यात 5 लाख 56 हजार 512 रुग्ण बरे झाले. बुधवारी 78,727 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 83, 162 रुग्ण बरे झाले. तर 961 जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी 10 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांत 78% नवीन रुग्ण आढळले. 24 राज्यांमध्ये नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त राहिले.

देशातील एकूण रुग्णसंख्या 68.32 लाख झाली आहे. यातील 58.24 लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 1.05 लाख लोकांनी आपला जीव गमावला. देशात सध्या पॉझिटिव्हिटी दर 8.3% सुरू आहे. म्हणजेच प्रत्येक 100 चाचण्यांमागे 8 लोक पॉझिटिव्ह सापडत आहेत.

मागील 19 दिवसांत 1.10 लाख अॅक्टिव्ह रुग्ण कमी झाले. 17 सप्टेंबर रोजी देशात सर्वाधिक 10.17 लाख अॅक्टिव्ह रुग्ण होते, ते आता घटून 9.09 लाखावर आले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 2 लाख 47 हजार 23 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी पॉझिटिव्ह

देशातील अनेक नेते आणि मंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. बुधवारी केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या ते घरीच क्वारंटाइन झाले आहे. दुसरीकडे केरळचे शिक्षणमंत्री केटी जलील देखील पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दिल्लीत आठवडे बाजार सुरू होणार

दिल्ली सरकारने 5 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे आणि थिएटर्स 50% आसर क्षमतेसह सुरू करण्याची परवानगी दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आता दिल्लीतील सर्व आठवडे बाजार देखील पूर्ववत सुरू होतील. यामुळे गरीबांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत केवळ 2 बाजार दररोज प्रत्येक झोनमध्ये सुरू करण्याची परवानगी होती.