बारा तासात रिझल्ट आल्याने वडगांवकर मठ सुखावला

 

जयराम स्वामी मठासमोरील घाणीचे साम्राज्य दाखविताना मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज

स्थैर्य, कातरखटाव, दि. ३० : खटाव तालुक्यातील वडगांव येथील जयराम स्वामी संस्थानचा पंढरपूर येथील कासार घाटाजवळ पुरातन मठ आहे. या मठासमोर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ही बाब शिवस्वराज्य युवा संघटनेच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहचली. कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा व मुख्याधिकार्‍यांनी केवळ 12 तासाच्या आत या समस्येचे निराकरण केल्याने वडगांवकर मठातील भाविक चांगलेच सुखावले.


याबाबत अधिक माहिती अशी: कोरोना परस्थितीमुळे अलिकडच्या काळात पंढरपूरला जाणार्‍या भक्तांची संख्या चांगलीच रोडावली आहे. अश्या परस्थितीत प्रशासनाच्या स्वच्छता मोहिमेसही स्थुलता आली होती. सलग दोन वारीला गेल्यानंतर जयराम स्वामी मठा समोर कचर्‍याचा ढीग जसाच्या तसा होता. ही बाब अत्यंत वेदनादायी असल्याने मठाचे हितचिंतक व वडूज येथील सृजनशील पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी ‘ त्या ’ घाणीनजीक मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराजांना उभे करून एक फोटो काढला. तो फोटो पंढरपूर मधील मित्र व शिवस्वराज्य युवा  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे पाटील यांना सोशल मिडीयावर पाठवला. त्यांनीही पोटतिडकीने हा फोटो थेट पंढरपूर नगराध्यक्षा सौ. साधानाताई नागेश भोसले, पंढरपूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर याना पाठवला. त्यांनीही या प्रकाराची गांभिर्याने दखल घेत सफाई कर्मचार्‍यांना सक्त ताकीद देऊन परिसराची स्वच्छता करण्याबरोबरच औषध फवारणी ही करून घेतली. केवळ एका मेसेजमुळे मोजून बारा तासात अनेकांची नरक यातनेतून मुक्तता झाली.


12 तासाच्या आत नगरपंचायतीने राबविलेली स्वच्छता मोहिम.सकारात्मक कामाची पोहोच पावती : विठ्ठलस्वामी

याबाबत मठाधिपती विठ्ठलस्वामी म्हणाले, पंढरपूर येथील मठ परिसरातील घाणीचा त्रास गेली अनेक वर्षे आम्ही सहन करत आलो आहोत. आमच्याबरोबर वारीला सहज पत्रकार मित्र व मठाचे हितचिंतक  क्षीरसागर आले. त्यांच्यातील सृजनशील पत्रकार व कार्यकर्ता जागा झाल्याने मठ परिसरातील शेकडो रहिवाशी तसेच वारकरी भाविकांची नरक यातनेतून मुक्तता झाली आहे. त्यांच्यासह ‘ शिवस्वराज्य’ चे संस्थापक श्री. मुटकुळे, नगराध्यक्षा  भोसले, मुख्याधिकारी मानोरकर स या सर्वांच्या प्रयत्नामुळे सकारात्मक कामाची चांगली पोहोच मिळाली आहे. जयराम स्वामी मठाच्या वतीने या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद.
Previous Post Next Post