आम्ही फक्त सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तीनच राजांना मानतो; प्रकाश आंबेडकरांचे उदयनराजे समर्थकांच्या टीकेला प्रत्युत्तर


स्थैर्य, दि.१०: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि भाजपा नेते उदयनराजे भोसले आमनेसामने आले आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही तर सगळ्यांचे आरक्षण रद्द करा अशी मागणी उदयनराजे यांनी केली होती. यावरून उदयनराजे बिनडोक असल्याची टीका आंबेडकर यांनी केली होती. यानंतर उदयनराजे समर्थकांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडले होते. आता त्यालाच प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूची आहे." पुतळे जाळा, काहीही केले तरी आम्ही आमची भूमिका व पक्षाची भूमिका बदलणार नाहीत. ही भूमिका वैचारिक आहे, आणि ती कायम राहील, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. ते म्हणाले होते की, 'दोन्ही राजांचा मराठा आरक्षणप्रश्न बंदला पाठिंबा असल्याचे वाचनात कुठेही आलेले नाही. एक राजा तर बिनडोक असल्याचे मी म्हणेन, तर दुसरे संभाजी राजे यांनी आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका बरोबर आहे. मात्र ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिकभर देत असल्याचे दिसत आहे. ज्या माणसाला राज्य घटना माहिती नाही. ‘आम्हाला आरक्षण मिळाले नाही, तर सर्वांचे आरक्षण रद्द करा’, अशी ते भूमिका मांडतात. त्यावरून त्यांना भाजपने राज्यसभेवर कसे पाठवले? हाच प्रश्न उपस्थित होतो' असा टोलाही त्यांनी उदयनराजेंना लगावला होता.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya