लवकरच शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण करणार; मनसेच्या उपोषणाला फलटण नगरपरिषदेचे उत्तर

 

स्थैर्य, फलटण, दि. २२ : आगामी काही दिवसांमध्ये फलटण शहरातील सर्व प्रमुख चौकांचे सुशोभीकरण मासिक सर्वसाधारण सभेच्या मंजुरीने करण्यात येईल अशी ग्वाही फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्या वतीने बांधकाम अभियंता पंढरीनाथ साठे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांना दिलेली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून फलटण शहरातील डेक्कन चौक येथे फलटण नगर परिषदेने सुशोभीकरणाचे काम हाती घेतलेली आहे. हे काम करत असताना याचा फायदा एका खासगी हॉटेलला होणार असल्याने व हे सुशोभीकरणाचे काम सुरू असताना फलटण येथील महत्त्वाचे असणार्या लाईफलाईन हॉस्पिटलचा रस्ता बंद केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे हे फलटण नगरपरिषदेच्या आवारात उपोषणाला बसलेले होते. 

यावेळी मनसेचे निलेश जगताप , महेंद्र वर्पे ,विनोद शेळके, निलेश कदम ,रुपेश मदने व इतर कार्यकर्ते उपोषण स्थळी उपस्थित होते.

फलटण नगर परिषदेने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता जर करण्यात आली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुन्हा उपोषणाला बसले जाईल व मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल. असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांनी या वेळी दिलेला आहे.