बेकायदेशीरपणे देशी रिव्हॉल्वर बाळगल्याप्रकरणी युवकास अटक,पाच जिवंत काडतुसेही ताब्यात

 


स्थैर्य, सातारा, दि. २१ : बेकायदेशीररीत्या देशी रिव्हॉल्वर जवळ बाळगल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारास पाठलाग करून पकडले.मंगळवारी सायंकाळी नागठाणे (ता.सातारा) येथे महामार्गावरील बाबा पंजाबी ढाबा येथे ही घटना घडली.समीर सुनील घोरपडे (वय.२२,रा.मूळ.मत्त्यापुर,ता.सातारा.हल्ली रा.चौंडेश्वरी हॉलच्या पाठीमागे,नागठाणे,ता.सातारा) असे ताब्यात घेतलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.


याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,नागठाणे येथील महामार्गावरील हॉटेल बाबा पंजाबी ढाबा जवळ एक युवक कमरेला रिव्हॉल्वर लावून फिरत आहे अशी गोपनीय बातमी सपोनि डॉ.सागर वाघ यांना मंगळवारी सायंकाळी मिळाली.यावेळी पोलिसांनी तेथे सापळा रचला.सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास संबंधित युवक त्यांना तेथे आढळला.पोलिसांना पाहताच युवक कावराबावरा होऊन तेथून पळून जाऊ लागला.यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला जेरबंद केले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला सुमारे ४०,५०० रुपये किमतीचे एक देशी रिव्हॉल्वर व ५ जिवंत काडतुसे आढळून आली.पोलीस तपासात त्याचे नाव समीर सुनील घोरपडे असल्याचे सांगितले.समीर घोरपडे हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्याने हा देशी कट्टा सुमारे पाच वर्षांपूर्वी एका बिहारी व्यक्तीकडून नागठाणेतच घेतला असल्याचे सांगितले.


पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटिल व सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि डॉ.सागर वाघ,पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर,हवालदार मनोहर सुर्वे,राजू शिखरे,किरण निकम,विशाल जाधव,विजय साळुंखे,प्रकाश वाघ व कपिल टीकोळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार  रामचंद्र फरांदे करत आहेत.