महिलांच्या लोकल प्रवासाला रेल्वे बोर्डाचा ‘रेड सिग्नल’!

 


स्थैर्य, मुंबई, दि.१७: घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकारने महिलांसाठी मुंबई लोकल सेवा सुरू करण्याची भूमिका घेतल्याने महिलांना दिलासा मिळाला होता. मात्र, राज्य सरकारच्या या भूमिकेविरोधात रेल्वे बोर्डाने पश्चिम आणि मध्य लोकल सेवा महिलांसाठी सुरू होणार नाही, असा निर्णय घेतला. एका दिवसात लोकल सेवा सुरू करणे शक्य नाही, असे रेल्वेकडून सांगितल्याने महिला प्रवाशांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

लोकल सेवा सुरू करावी, अशी विनंती राज्य सरकारने पत्राने केली. मात्र, लगेच लोकल सुरू करता येणार नाही. रेल्वे बोर्डासमोर प्रस्ताव ठेवला आहे. तसेच लोकल सेवा वाढवण्यास काही यंत्रणा, कर्मचारी वाढवावे लागतील. ही सेवा लगेच एका दिवशी सुरू करणे शक्य नाही, तसे पत्राद्वारे राज्य सरकारलाही कळवल्याचे पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. रेल्वे बोर्डाने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. जोपर्यंत रेल्वे बोर्ड निर्णय घेत नाही, तोपर्यंत महिलांना लोकलने प्रवास करता येणार नाही. यामुळे लोकल प्रवासासाठी इच्छुक असणा-या महिलांचा हिरमोड झाला आहे. यावरून केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेले रेल्वे बोर्ड व राज्य सरकार यांच्यात असलेला वाद पुन्हा समोर आला आहे.

राज्य सरकारने महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यासंदर्भात पत्रक काढले होते. तसेच हे पत्रक रेल्वे विभागाला पाठवण्यात आले. त्यात महिलांना प्रवासाची मुभा द्यावी, अशी विनंती करण्यात आली. पत्रात दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 7 नंतर शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती करण्यात आली. सकाळी मात्र लोकलमध्ये महिलाांना प्रवास करता येणार नाही, असेही नमूद करण्यात आले होते. प्रवासासाठी क्यूआर कोडची गरज नाही. सर्वच महिलांना लोकल प्रवास करता येईल, असेही सांगण्यात आले होते.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya