मोदींच्या वैयक्तिक वेबसाइटचा ‘डेटा लिक’; सायबर सेक्युरिटी फर्मचा दावा

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१८: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक वेबसाइट सप्टेंबर महिन्यात हॅक झाली होती. त्यानंतर त्या वेबसाइटद्वारे ट्विट करत फॉलोअर्सना क्रिप्टोकरन्सीद्वारे पीएम नॅशनल रिलीफ फंडात दान करण्याचे आवाहन करण्यात आले. काही वेळानंतर अकाउंट रिस्टोअर झाले होते. आता मात्र अमेरिकी सायबर सेक्युरिटी फर्म सायबलने या हॅकिंगबाबत दावा केला आहे. हे हॅकिंग वेबसाइटच्या कॉनफिगरेशनद्वारे झाले होते असे सायबलचे म्हणणे आहे. कंपनीने डार्क वेबसाइटवर वेबसाइटचा डेटाबेस आढळल्याचे म्हटले आहे. कंपनीने आपल्या अहवालात डार्कवेबवर असलेल्या डेटाबाबत बराच तपशील दिला आहे.

सायबलच्या म्हणण्यानुसार, वेबसाइट यूजर्सबाबत अनेक प्रकारची खासगी माहिती लिक झाली आहे आणि ती सर्व डार्क वेबसाइटवर उपलब्ध आहे. तब्बल ५ लाख ७० हजारहून अधिक यूजर्सची खासगी माहिती लिक झाल्याचेही कंपनीने म्हटले आहे. यात त्यांची नावे, ईमेल आयडी आणि कॉन्टॅक्ट डीटेल्सचा समावेश आहे. या डेटाचा गुन्हेगारी स्वरुपाचा वापर केला जाऊ शकतो अशी शंकाही कंपनीने उपस्थित केली आहे. या सर्व डेटाचा उपयोग फिशिंग ईमेल, स्पॅम टेक्स्ट मेसेजेस पाठवण्यासाठी केला जाऊ शकतो, असे सायबलने म्हटले आहे.

डार्क वेबवर देणग्यांबाबतचा तपशील असलेला डेटाबेस देखील लिक झालेला आहे. वेबसाइटच्या एकूण ५ लाख ७० हजार यूजर्सपैकी २ लाख ९२ हून अधिक यूजर्सनी देणग्या दिलेल्या आहेत. यात कोविड-१९ व्यतिरिक्त स्वच्छ भारत, बेटी बचाओ-बेटी पढाओसारख्या अभियानांसाठीही देण्यात आलेल्या दानाचा देखील समावेश आहे. त्या यूजर्सनी कोणत्या मोडद्वारे, कोणत्या बँकेद्वारे पेमेंट केले, याचा तपशील देखील उपलब्ध आहे.

कोणकोणत्या यूजर्सचा डेटा लिक झाला आहे, याबाबत अमेरिकन कंपनीने एका वेबसाइटवर माहिती दिली आहे. यूजर्सचा डेटा लिक झाला किंवा नाही याची माहिती कंपनीच्या वेबसाइटवर गेल्यानंतर मिळू शकते. जर डेटा लिक झाला असेल, तर तो कुठे-कुठे झाला आहे, याबाबतची माहिती देखील वेबसाइटवर उपलब्ध आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya