फलटण तालुक्यात सरसकट पंचनामे करून शेतकर्यांना तत्काळ मदत द्या; विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची मागणी

 

स्थैर्य, फलटण, दि. २२ : गत काही महिन्यांमध्ये अवकाळी पावसाने फलटण तालुक्यामध्ये थैमान घातलेले आहे. अशा पावसामध्ये फलटण तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहे. त्याचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे सविस्तर निवेदनाद्वारे केलेली आहे.

अतिवृष्टीमुळे फलटण तालुक्यामध्ये सुमारे साडेचार हजार हुन अधिक हेक्टर क्षेत्र बाधित झालेली आहे. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कांदा, बाजरी, सोयाबीन, ऊस व फळबागा आणि विविध पिकांचे नुकसान झालेले आहे. तरी पण तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारन कडुन तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

याबाबत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुद्धा विविध अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यात यावी, या बाबतचे निर्देश दिलेले आहेत. परंतु राज्य शासनाकडून अद्यापही कोणतेही निर्देश अधिकाऱ्यांना प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, असेही निवेदनात स्पष्ट केलेले आहे.