न्यायपालिकेचा अवमान केल्याचा आरोप करत कंगनाविरोधात तक्रार

 

स्थैर्य, मुंबई, दि.२३: न्यायपालिकेविरूद्ध ‘दुर्भावनायुक्त आणि अपमानजनक’ ट्विट पोस्ट केल्याचा आरोप करत अभिनेत्री कंगना रणौत हिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील स्थानिक कोर्टाच्या आदेशानंतर शहरातील वकिलाने ही फौजदारी तक्रार दाखल केली. यापूर्वी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशावरून तिच्याविरुद्ध आणखी एक तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कंगना रणौत आणि तिच्या बहिणीला पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावले आहे. एकंदरित पुन्हा एकदा मुंबई पोलीस विरुध्द कंगना रणौत अशी परिस्थिती येणा-या काळात पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

अंधेरी कोर्टात अभिनेत्रीविरोधात वकील वकील अली कासिफ खान देशमुख यांनी देशद्रोह आणि तिच्या ट्विट्समधून धार्मिक समुहांमध्ये वाद निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीमध्ये असे म्हणण्यात आले आहे की, ही बॉलिवूड अभिनेत्री भारतातील विविध समुदाय, कायदा आणि अधिकृत सरकारी संस्था यांचा आदर करत नाही आणि तिने न्यायपालिकेची खिल्ली उडवली आहे.

तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, वांद्रे कोर्टाद्वारे मुंबई पोलिसांना कंगनाविरोधात तक्रार करण्याचे आदेश दिल्यानंतर कंगनाने न्यायपालिकेविरूद्ध ‘दुर्भावनायुक्त आणि अपमानजनक’ ट्विट पोस्ट करत ‘पप्पू सेना’ म्हटले होते. अंधेरी न्यायालयामध्ये याप्रकरणी 10 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.