जिल्हयातील पात्र लघु उद्योजकांनी पुरस्कारासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

 

स्थैर्य, पुणे दि. १५: जिल्हयातील उद्योग क्षेत्रातील असामान्य कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांकरिता राज्य शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतात. सदर जिल्हा पुरस्कार प्रथम क्रमांकास रुपये 15 हजार व द्वितीस पुरस्कारास रुपये 10 हजार व मानचिन्ह देण्यात येते.

जिल्हा पुरस्कारासाठी ज्ञापन पोहोच भाग- 2 हा स्थायी लघु उद्योग म्हणून उद्योग संचालनालय यांच्याकडे मागील तीन वर्षे नोंदणीकृत असावा, ( दिनांक 01 जानेवारी 2017 पुर्वीचे भाग- 2 ) तसेच उद्योग घटक मागील दोन वर्षे सलग उत्पादन प्रक्रीयेत असलेला असावा. सदर लघु उद्योग कोणत्याही संस्थेचा, बँकेचा थकबाकीदार नसावा.

या पुरस्कारासाठी   लघु उद्योगांची निवड ही त्याने केलेली भांडवली गुंतवणुक, तंत्रज्ञान, स्वावलंबन, उद्योजकता तसेच प्रथम पिढीतील नव उद्योजक, उत्पादीत वस्तू बाबतची गुणवत्ता, निर्यातक्षम सनदी लेखापाल यांचे प्रमाणपत्र  या बाबींचा विचार करण्यात येतो.

जिल्हयातील पात्र लघु उद्योजकांना या पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2020 अशी राहील.

विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांच्याकडे विनामूल्य उपलब्ध आहेत. अर्जा करिता व पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांचे कार्यालय, कृषि महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, पुणे दूरध्वनी क्रमांक (020- 25539587 /  25537541) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र,पुणेचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya