उद्धव ठाकरेंकडून शपथविधीनंतर बिल्डरला ३४५ कोटींचे ‘गिफ्ट’

 

स्थैर्य, मुंबई, दि.१३: भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंनी शपथविधीच्या दुस-याच दिवशी ३४५ कोटी बिल्डरला गिफ्ट दिले असा आरोप किरीट सोमय्या यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी केला. किरीट सोमय्या यांनी यावेळी तीन घोटाळ्यांची माहिती देत त्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आल्याचंही सांगितलं. याच्यासंबंधी संजय राऊत किंवा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यामध्ये हिंमत असेल तर बोलावं असं आव्हानही यावेळी त्यांनी दिलं.

मुंबईच्या एसआरए गाळ्यामध्ये घोटाळा केल्याचा आरोप करत किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, ठाकरे सरकार आणि एसआरएविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिवाळीनंतर या जनहित याचिकेवर सुनावणी होईल असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

‘ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर २८ नोव्हेंबरला आणखी तीन घोटाळ्यांची कायदेशीर कारवाई सुरु करणार आहे. यासंबंधी मुंबई हायकोर्टात दोन जनहित याचिका आणि एक लोकायुक्तांकडे दाखल होणार आहे,’ अशी माहिती यावेली किरीट सोमय्या यांनी दिली.

‘ठाकरे सरकार म्हणजे रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचं श्रीखंड करण्यात गुंतलेलं सरकार दिसत आहे. मी याआधी दहिसर जमीन घोटाळ्याचा विषय काढला होता. संजय राऊत ऐकत असतील तर त्यांनी स्पष्ट ऐकावं. जी जमीन २ कोटी ५५ लाखांत अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली ती ९०० कोटीत विकत घेण्यासाठी मुंबई महापालिका निघाली आहे. यामधील ३५४ कोटी आधीच दिले आहेत,’ असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

‘उद्धव ठाकरेंचा २८ नोव्हेंबरला शपथविधी झाल्यानंतर दुस-याच दिवशी अल्पेश अजमेरा बिल्डरला ३४५ कोटी गिफ्ट म्हणून देण्यात आले. मुळ प्रश्न मी नाही तर उद्दव ठाकरे आणि संजय राऊत वळवत आहेत. अन्वय नाईक कुटुंबासोबत त्यांचे संबंध होते आणि आहेत. सातबारा खोटे आहेत असं उत्तर द्या ना,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

‘अल्पेश अजमेराकडून २ कोटी ५५ लाखांची जमीन संजय राऊत तुमची महापालिका ९०० कोटीत घेते. जे मूळ मुद्दे आहेत ते टाळू नका,’ असं प्रत्युत्तर किरीट सोमय्या यांनी दिलं आहे. ‘मी उद्धव ठाकरेंना फक्त पाच प्रश्न विचारले आहेत त्यातील एकाचं तरी उत्तर द्या. महाराष्ट्राच्या जनतेला माहिती हवी आहे. शिवसेनेत हिंमत नाही म्हणून विषय वळवत आहेत,’ अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

‘मी आणखी नऊ सातबारा उतारे सादर करत आहेत. परवा एक सातबारा दिला तर लोक मला येऊन माहिती देतात, अधिकारी देत नाहीत. ३० जमिनीचे व्यवहार अन्वय नाईक कुटुंबासोबत रश्मी ठाकरे यांनी केले आहेत. आणखी माहिती हवी असेल तर देतो. एकंदर मान्यवर ठाकरे परिवाराचे ४० जमीन व्यवहार झाले आहेत त्यापैकी ३० अन्वय नाईक कुटुंबासोबत आहेत,’ असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

‘उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी उत्तर द्यावं. ४० पैकी ३० जमीन व्यवहार अन्वय नाईक कुटुंबासोबत का आहेत याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं. रश्मी ठाकरेंच्या प्रतिनिधीने द्यावं. आर्थिक व्यवहार करत आहेत, याशिवाय मी काही आरोप केलेले नाहीत. मी फक्त खुलासा मागितला आहे. यांची उत्तर देण्याची हिंमत नाही. किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल पुरावे देऊनही उद्धव ठाकरेंनी कारवाई केली नाही. संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन कारवाई करावी. मी दिलेली कागदपत्रं चुकीची असतील तर जेलमध्ये टाका. पण उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत नाही. शिवसेनेत हिंमत असेल तर किरीट सोमय्याला हात लावून दाखवा,’ असं जाहीर आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलं आहे.

‘उत्तरं देता येत नाहीत म्हणून शिव्या द्यायला निघाले आहेत ही तुमची संस्कृती आहे. अनिल परब यांनी म्हाडाची जमीन खाल्ली. म्हाडाने नोटीस दिली आहे. संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर किरीट सोमय्यावर कारवाई करावी,’ असंही ते म्हणाले आहेत. ‘ठाकरे सरकार घोटाळेबाज सरकार आहे. हिंमत असेल तर ठाकरे सरकारच्या कोणत्याही प्रवक्त्याने किरीट सोमय्याशी बोलावं. ही भाषा, हे संस्कार त्यांचे आहेत. मला त्यांच्या भाषेत, संस्कारात पडायचं नाही,’ असं किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना म्हटलं आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यातील जमीन व्यवहार प्रकरण जाणीवपूर्वक समोर ठेवून अर्णव गोस्वामी प्रकरणावरील लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतायत का?, असा प्रश्न भाजपाचे नेते चंद्रकांत पाटलांना विचारण्यात आला होता. त्याला भाजपाचे नेते चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं आहे. किरीट सोमय्या यांनी कराराचे पेपर काढले आहेत, ते खोटे असतील तर त्यांनी कोर्टात जावे, असे पाटील म्हणाले. लोकशाहीत किरीट सोमय्यांना आरोप करण्याचा अधिकार आहे, त्यांनी ते खोडावेत, असंही चंद्रकांत पाटील शिवसेनेला उद्देशून म्हणाले आहेत.

या महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे का?, असा सवाल करत आम्हाला आमच्या भावना व्यक्त करायला मिळणार की नाही. मंदिरासाठी संत महंतांनी आंदोलन केले की अटक करून कलमे लावली जातात. शेतक-यांनी झुणका भाकर आंदोलनास परवानगी मागितली तर नाकारण्यात आली, यामुळे महाराष्ट्र शासनाच्या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो. गेल्या 11 महिन्यांपासून या सरकारचा जो हैदोस चालू आहे हे सर्वसामान्यजनता पाहत असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.