एसटीवर दुसरा आघात; जळगावनंतर रत्नागिरीतही कर्मचाऱ्याची आत्महत्या

 स्थैर्य, रत्नागिरी, दि.९: रत्नागिरी एसटी डेपोतील चालकाने रविवारी दुपारी आत्महत्या केल्याचे उघड झाले असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी गेले तीन महिने पगार न मिळाल्याने तणावातून त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता एसटी कर्मचाऱ्यांसह संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पगार नसल्याने कटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा या विवंचनेतूनच या चालकाने आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला असावा, असे त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितले.

पांडुरंग संभाजीराव गडदे (वय ३५) असे आत्महत्या करणाऱ्या चालकाचे नाव आहे. ते मूळचे बीड जिल्ह्यातील परळी येथील असून रत्नागिरीतील माळनाका येथे रेंटवर राहत होते. रविवारी सकाळी नांदेड-रत्नागिरी असा प्रवास करून ते परतले होते. ड्युटी आटोपून ते आपल्या माळनाका येथील घरी गले होते. दरम्यान, दुपारनंतर त्यांचा सहकारी खोलीवर गेला असता दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शेजाऱ्यांना याबाबत कल्पना देऊन लगेचच पोलिसांनाही कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरवाजा उघडला असता पांडुरंग हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातून वैदयकीय अहवाल आल्यानंतरच पुढील तपासाची दिशा ठरेल, असे रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक अनील लाड यांनी पत्रकारांना सांगितले.


 

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya