भाजपचे उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांना फलटण तालुक्यातून मताधिक्य देणार

 


स्थैर्य, फलटण दि.२१ : महाराष्ट्र विधान परिषद पुणे पदवीधर मतदार संघातील भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांना फलटण शहर व तालुक्यातून भरघोस मतदान होईल यासाठी सर्वांनी नियोजन पूर्वक काम करावे असे आवाहन भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी केले आहे.

पुणे पदवीधर मतदार संघातील आगामी निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर मलठण (फलटण) येथे आयोजित भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना जयकुमार शिंदे बोलत होते, अध्यक्षस्थानी जिल्हा सरचिटणीस भरत मुळे होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मनोज कलापट, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, सुरेश निंबाळकर, जिल्हा सचिव मुक्ती शहा, तालुकाध्यक्ष विष्णुपंत लोखंडे युवा मोर्चा अध्यक्ष नानासाहेब इवरे, किसान मोर्चा अध्यक्ष धनंजय पवार, शहराध्यक्ष नितीन वाघ, महिला मोर्चा अध्यक्षा उषा राऊत, कामगार आघाडी अध्यक्ष पै. बाळासाहेब काशीद, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सागर अभंग, शहराध्यक्ष राजेश शिंदे, भटक्या विमुक्त जमाती सेल तालुकाध्यक्ष सुनील जाधव, शहर उपाध्यक्ष किरण राऊत, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष रियाज इनामदार, सागर लंभाते, सरचिटणीस सुधीर जगदाळे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य कशा पद्धतीने देता येईल याबाबत मार्गदर्शन करताना प्रत्येक गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरी जाऊन आपल्या उमेदवाराची भूमिका समजावून सांगावी, हा मतदार संघ पारंपारिक भारतीय जनता पक्षाचा असल्यामुळे या मतदार संघांमध्ये भाजपचा उमेदवार निवडून येईल यामध्ये कसलीही शंका नाही परंतू कार्यकर्त्यांनी गाफील न राहता खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे हात बळकट करण्यासाठी तालुक्यामधून जास्तीत जास्त मताधिक्य पदवीधर व शिक्षक मतदार संघातील आपल्या उमेदवारांना देऊन विजयी करावे असे आवाहन जयकुमार शिंदे यांनी केले आहे.

जिल्हा सरचिटणीस भरत मुळे यांनी अध्यक्षीय भाषणात पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी उद्यापासून कशा पद्धतीने काम केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले, प्रत्येक पन्नास मतदारा मागे एक पदाधिकार्‍यांनी जबाबदारी घेऊन उमेदवारांचा प्रचार करायचा आहे तसेच मतदारांना मतपेटी पर्यंत आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे व या विजयामध्ये फलटण तालुक्याचा सिंहाचा वाटा असावा अशी अपेक्षा मुळे यांनी व्यक्त केली.

नगरसेवक सचिन अहिवळे यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संदीप जाधव यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya