हिंगोलीतील गांजा शेती : तीन महिन्यात सहा कारवाया; 20 वर्षांच्या तुरुंगवासाची परवा न करता हिंगोलीतील शेतकरी का घेत आहेत गांजाचे पिक ?

 

स्थैर्य, हिंगोली, दि.१८: हिंगोली जिल्ह्यांमध्ये पोलीस विभागाने हापसापूर शिवारातून जप्त केलेला २१.७३ लाख रुपये किमतीचा गांजा हिंगोली जिल्ह्यासाठी चिंतेची बाब बनली आहे. मागील तीन महिन्यात गांजाची ही सहावी कारवाई आहे. पारंपारीक शेती कडून शेतकरी गांजाच्या शेतीकडे का वळत आहे हा संशोधनाचा विषय बनला आहे.

हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील वीस वर्षांपूर्वी कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते. त्यामुळे या भागात तब्बल २० पेक्षा अधिक कापूस प्रक्रिया उद्योग सुरु होते. मराठवाड्याचे मँचेस्टर म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर कापूस लागवड व काढणीपर्यंत लागणारा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी कडे आपला काल वळवला आहे.

शेतकऱ्यांमागचा शुक्लकाष्ठ कायमच

जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या ३.४० लाख हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी तब्बल २.५० लाख हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. मात्र शेतकऱ्यांच्या पाठीमागे असलेली शुक्लकाष्ठ कायमच राहू लागले आहे. जिल्ह्यात मागील पाच वर्षांमध्ये कधी ओला दुष्काळ तर कध कोरडा दुष्काळ पडला आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. मात्र या परिस्थितीतही शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीवर व शेतातून येणाऱ्या उत्पन्नावर शेतकरी अवलंबून आहे.

पोलिसांचे अनेक ठिकाणी छापे

हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही भागात विशेषतः वसमत व औंढा तालुक्यामध्ये काही शेतकरी चोरून-लपून गांजाची शेती करू लागल्याचे स्पष्ट होत आहे. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने वसमत तालुक्यातील नहाद औंढा तालुक्यातील उमरा या भागात चार ठिकाणी छापे टाकले. याशिवाय औंढा नागनाथ तालुक्यातील धारखेडा येथेही गांजाची शेती पकडण्यात आली होती. या पाच ठिकाणी टाकलेल्या छाप्यात सुमारे २ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त झाला होता. त्यामुळे पोलिसांचे लक्ष गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडे वळले आहे.

दरम्यान वसमत तालुक्यातील हापसापूर येथे नामदेव सवंडकर यांच्या शेतामध्ये उसाच्या पिकात तब्बल २.७३ किलो गांजाची शेती आढळून आली. पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक आतिष देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, सुनील गोपीनवार यांच्या पथकाने मंगळवारी छापा टाकून उसाच्या शेतातील गांजाचे ३४५ झाडे जप्त केली.

इतर पिकांमध्ये गांजाची लागवड

गांजा लागवड करताना उंच वाढणाऱ्या पिकांमध्ये गांजाचे बी लावले जाते. तुर, ऊस, हळद या पिकांतून गांजाची झाडे लावले जात असल्याचे आतापर्यंतच्या छाप्यात स्पष्ट झाले आहे. याशिवाय मुख्य रस्त्यापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत असलेल्या शिवारामध्ये गांजाची लागवड केली जात आहे. दूर अंतरावरील शेतात पोलिसांना येणे शक्य होत नाही हे गृहीत धरून गांजाची लागवड केली जाते.

शेतकऱ्यांना गांजाचे बियाणे मिळतात कुठून ?

हापसापुर शिवारात जून महिन्यामध्ये शेतकऱ्याने गांजाचे बी लावले होते. दीड एकर क्षेत्रामध्ये ऊस व या ऊसामध्ये गांजाची बी लावण्यात आले. सध्या गांजाची झाडे उंच वाढली होती. तसेच गांजाची बोंडे काढणीच्या अवस्थेत आली होती. मात्र या शेतीची कुणकुण पोलिसांना लागताच पोलिसांनी सर्व गांजा उपटून जप्त केला आहे. ३४५ झाडांचे वजन २.७३ किलो भरले असून त्याची किंमत तब्बल २१.७३ लाख रुपये एवढी आहे . पोलिसांनी शेतकरी नामदेव सवंडकर यांना अटक करून त्यांची अधिक चौकशी सुरू केली आहे. शेतकऱ्याने गांजाची बी आणले कुठून याची माहिती पोलिसांना दिली नसली तरी सदरील गांजा नांदेड वसमत या भागात विक्री केल्या जात असल्याचे सांगितले. त्यासाठी काही व्यक्ती गांजा नेण्यासाठी येतात असेही त्यांनी पोलिसांच्या चौकशी मध्ये सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील विशेषतः औंढा वसमत तालुक्यांमध्ये शेतकरी गांजाच्या शेतीकडे का वळत हा जिल्ह्यासाठी चिंतेचा तसेच संशोधनाचा विषय देखील बनला आहे.

20 वर्षांच्या शिक्षेची तरतूद

राज्यामध्ये गांजाची शेती करण्यास परवानगी नाही. गांजाची शेती आढळून आल्यास तसेच गांजाची वाहतूक करणाऱ्या विरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई केली जाते. राज्यात गांजाची वाहतुक करणे, गांजा लावणे कायद्याच्या विरुध्द आहे. त्यामुळे अशा प्रकरणात पोलिस कारवाई केली जाते. हिंगोली जिल्हयात मागील चार महिन्यात गांजाच्या शेतीचे सहा प्रकार उघडकीस आले आहे.

गांजा बाळगणे व वाहतुक करणे गुन्हा आहेत. संबंधीत व्यक्तीकडे पाच किलो गांजा आढळून आल्यास सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते. तसेच पाच ते वीस किलो गांजा आढळून आल्यास दहा वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. तर वीस किलो पेक्षा अधिक गांजा आढळून तो प्रकार व्यावसायीक असल्याचे स्पष्ट होत असून त्यासाठी २० वर्षापर्यंत शिक्षेची तरतुद आहे.