मृत अर्भकप्रकरण : कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणावर ग्रामस्थांचा 'प्रहार'; हेळवाकला अर्धनग्न आंदोलन

 


स्थैर्य, कोयनानगर, दि.१९: चार दिवसांच्या स्त्री अर्भकाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी अर्भकाच्या पालकांसह प्रहार संघटनेने हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर कालपासून अर्धनग्न आंदोलन सुरू केले. 

कोयना विभागातील नाव गावातील महिलेची घरीच प्रसूती 14 ऑक्‍टोबरपूर्वी झाली. त्यानंतर त्याची आई चार दिवसांनंतर हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराला दाखल झाली. तेथे अर्भकाचा मृत्यू झाला. हेळवाक आरोग्य केंद्रात योग्य उपचार न झाल्याने व तेथील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अर्भकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यांचे वडील गंगाराम विचारे यांनी न्याय मिळावा, अशी मागणी केली होती.

त्यावरून प्रहार संघटनेचे कोयना विभाग अध्यक्ष भरत कुऱ्हाडे पीडिताला न्याय मिळावा, यासाठी पत्रव्यवहार करत होते. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पालक, प्रहार संघटना व कोयना विभागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरच ठिय्या मारून अर्धनग्न उपोषणाला सुरवात केली. तालुकाध्यक्ष शुभम उबाळे, मनसेचे समर्थ चव्हाण, सामजिक कार्यकर्ते रवींद्र सपकाळ, रवींद्र कदम, आप्पा चव्हाण, गंगाराम विचारे उपस्थित होते. 


संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली. त्याचा अहवाल आला आहे. बालक स्तनपान करताना गुदमरून मृत झाले. तो प्रकार हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला असला, तरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले नाही.