लग्नास नकार दिल्याने जातीवाचक शिवीगाळ व मारहाण

 

स्थैर्य,सातारा, दि.९: लग्नास नकार दिल्याबद्दल महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी चौघाजणांवर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच यावेळी महिलेचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतल्याचाही गुन्हा दाखल झाला आहे. सोहेल सुतार असे संशयीताचे नाव असून त्याची आई, काकी व आजी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत माहिती अशी, सातारा येथील हॉटेल राजतारा समोर सौ. नयना मधुकर जाधव यांना सोहेल सुतार व त्याच्या काकीने सोहेल कुठे आहे अशी विचारणा करत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच चटणीची पावडर टाकून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान सोहेल सुतार यानेही तेथे येवून सौ. जाधव यांना मारहाण केली. यावेळी सोहेलच्या आई व काकीने जाधव यांना जातीवाचक शिवीगाळ करत सोहेलशी लग्न कर असे सांगितले. त्यास नकार दिला असता चौघाही संशयीतांनी मारहाण करून सौ. नयना जाधव यांचा मोबाईल हिसकावून घेतला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपअधीक्षक आँचल दलाल करत आहेत.