अर्णब गोस्वामी यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात, स्युमोटो याचिका दाखल करून घेण्याची मागणी

 

स्थैर्य,मुंबई, दि १० : सध्या अटकेत असलेले रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासाठी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवला आहे. फडणवीस यांनी सोमवारी ट्विट करत अर्णब गोस्वामी प्रकरणात उच्च न्यायालयाने स्युमोटो याचिका दाखल करून घेण्याची मागणी केली.

अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना सध्या तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. शनिवारी सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आलेल्या अर्णब गोस्वामी यांनी आपल्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप केला होता. याच मुद्यावरून फडणवीस ट्विट केले आहे. ‘अर्णब गोस्वामी यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांवरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारकडून अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यापासून ते न्यायालयीन कोठडीत त्यांना चुकीची वागणूक दिली जात आहे. या सगळ्याची न्यायालयाने दखल घ्यावी घेऊन न्यायालयानं स्युमोटो याचिका दाखल करून घ्यावी,’ अशी विनंती फडणवीस यांनी न्यायालयाकडे केली आहे.

काय म्हणाले होते गोस्वामी?
‘माझा जीव धोक्यात आहे. सकाळी मला ६ वाजता उठवण्यात आलं आणि सांगितलं गेलं की, मला माझ्या वकिलांशी बोलण्याची परवानगी नाही. मला धक्का दिला आणि मारहाणही केली. कृपा करा, देशातील लोकांना सांगा, माझा जीव धोक्यात आहे. सर्वोच्च न्यायालयाला सांगा, मला तुरूंगात मारहाण झाली आहे. मला वाटतं की, सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात हस्तक्षेप करावा. मला वाटतं की सर्वोच्च न्यायालयानं माझी मदत करावी,’ असंही गोस्वामी यांनी म्हटलं होतं.