कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे पाच वर्षांच्या बालिकेची झाली आई- बाबांची भेट

 


स्थैर्य, कराड, दि.१३: दिवाळीच्या खरेदीसाठी आई- वडिलांबरोबर आलेली पाच वर्षांची चिमुकली शहरातील मुख्य बाजारपेठेत हरवली. आई- वडील कुठे दिसेनासे झाल्याने तिने हंबरडा फोडला. त्याचदरम्यान आई-वडीलही तिचा शोध घेत होते. त्या चिमुकलीचे रडणे ऐकून बाजारपेठेत कर्तव्य बजावत असलेल्या एका महिला पोलिसाने तिला जवळ बोलून शांत केले. तिच्याकडून माहिती घेऊन पोलिसांनी तिच्या आई- वडिलांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात दिले. त्याचीच चर्चा शहरात होती.

शहरातील बाजारपेठेत सध्या दिवाळीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. त्यात वाहनांचीही गर्दी वाढत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी पोलिस आणि वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी आहेत. शहर वाहतूक शाखेचे मिथुन बोलके व महिला कर्मचारी ज्योती कऱ्हाडे शहरातील चावडी चौक परिसरात कर्तव्यावर होते. त्या वेळी बाजारपेठेतील गर्दीमध्ये पाच वर्षांची चिमुकली रडत कावरीबावरी झाल्याचे त्यांना दिसली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिच्याकडे मायेने विचारपूस केली. ती आई-वडील सापडत नसल्याचे सांगत हंबरडा फोडत होती. त्या वेळी ज्योती कुराडे यांनी तिला खाऊ देऊन शांत केले.

त्याचदरम्यान श्री. बोलके हे संबंधित चिमुकलीच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी बाजारपेठेत फिरत होते. त्या वेळी बाजारपेठेत एक जण काहीतरी शोधत फिरत असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांची मुलगी हरवल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर खात्री करून पोलिसांनी संबंधित बालिकेस पालकांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी कर्तव्य बजावत असताना केलेल्या कामगिरीबद्दल पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी विजय गोडसे आदींनी पोलिस कर्मचारी श्री. बोलके व ज्योती कुऱ्हाडे यांचे अभिनंदन केले.