ग्रॅच्युइटीची रक्कम, थकीत पगार, रजेचा पगार आमचा आम्हाला द्या; कारखाना प्रशासन व नेतेमंडळी यांच्याशी कोणतेही वैर नाही

 

फलटण : आंदोलन स्थळी होळी पेटवून बोंबाबोंब करताना निकम व कामगार.

स्थैर्य, फलटण दि. १९ : आमची ग्रॅच्युइटीची रक्कम, थकीत पगार, रजेचा पगार आमचा आम्हाला द्या, आमचे कारखाना प्रशासन व नेतेमंडळी यांच्याशी कोणतेही वैर नाही, त्यामुळे आजही आमची चर्चा करण्याची तयारी आहे. चर्चेने मार्ग निघू शकतो, यावर आमचा ठाम विश्‍वास आहे, मात्र चर्चा झालीच नाही तर जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण व आंदोलन चालू  ठेवण्याचा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी  दिला आहे.

श्रीराम सहकारी साखर कारखाना व नीरा व्हॅली डिस्टीलरी या दोन्ही संस्थेतून निवृत्त कर्मचारी ग्रॅच्युइटीची रक्कम, थकीत पगार, रजेचा  पगार मिळावा यासाठी ऐन दिवाळीत संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली अधिकारगृह इमारतीसमोर साखळी उपोषणास बसले आहेत. कामगारांनी दिवाळी पाडव्याच्या दिवशी उपोषणस्थळी, होळी पेटवून श्रीराम कारखाना व्यवस्थापनाच्या नावाने बोंब मारून, शिमगा आंदोलन केले.
दिवाळीचा पाडवा सगळ्यांसाठी महत्त्वाचा दिवस असतो, परंतू आज दिवाळीच्या पाडव्याला या निवृत्त कामगारांना शिमगा आंदोलन करावे लागले आहे, गेले आठ दिवस येथे साखळी उपोषण चालू आहे, परंतू कारखाना व्यवस्थापन, कामगारांच्या ग्रॅच्युइटी बाबत कोणताही निर्णय घेत नसल्याचे दिसत आहे, आम्हाला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, त्यामुळे नाईलाजास्तव पाडव्यादिवशी शिमगा आंदोलन करावे लागल्याचे अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी सांगितले.

2017 पासून आमचे हक्काचे पैसे आम्हाला मिळाले नाहीत, आज रामनगरीत दिवाळीचा सण साजरा होतोय, परंतू आज इथे आम्हाला होळीचा सण साजरा करावा लागतोय, यासारखे दुर्दैव नाही. प्रशासनाला, आमची एकच विनंती आहे, आमची चर्चेची तयारी आहे, कुठलाही प्रश्‍न  चर्चेतून सोडवता येतो, प्रशासनाने आमचा प्रश्‍न त्वरित सोडवावा अशी मागणी रवींद्र फडतरे यांनी यावेळी केली.


दरम्यान दरम्यान श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे व कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर यांनी आंदोलनकर्त्यांना ग्रच्युईटी व इतर रकमा देण्याबाबत कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशील असून कारखान्याच्या आर्थिक अडचणीचा विचार करुन आंदोलन मागे घेण्याचे  आवाहन करण्यात आले आहे.

श्रीराम कारखान्याचे सर्व सेवानिवृत्त कामगार कर्मचार्‍यांची देणी देण्याबाबत या सर्वांशी व्यवस्थापनाने वेळोवेळी चर्चा केली असून देणे रकमापैकी काही रकमाही निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्यात आल्या आहेत. कारखाना व अर्कशाळा विभाग चालविण्यास दिलेला असल्याने कारखान्याकडे तातडीने कोणताही आर्थिक निधी उपलब्ध होत नाही तथापी फलटण नगर परिषदेने कारखान्याचे मालकीचे जमीन क्षेत्र रस्त्यासाठी अधिग्रहित केले असून त्याच्या नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडून येणे आहे त्यासंबंधी कार्यवाही सुरु असून सदर रक्कम उपलब्ध होताच सेवानिवृत्त कामगार कर्मचार्‍यांची थकीत रक्कम अदा करण्याचे आश्‍वासन कारखान्याच्यावतीने देण्यात आले आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya