माण-खटावातील राजकीय समीकरण बदलणार

 


स्थैर्य, सातारा, दि.१२ : माणगाव-खटावचे जिल्हा परिषद माजी सदस्य आणि शिवसेनेचे तरुण नेते रणजितसिंह देशमुख स्वगृही अर्थात काँग्रेसमध्ये बुधवारी मुंबईत प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यासह काही ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत देशमुख पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. देशमुखांच्या या प्रवेशमुळे काँग्रेस पक्षाला निश्चित बळ मिळणार असून माण-खटावातली राजकीय समीकरणं बदलणार आहेत. जयकुमार गोरे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माण-खटावात काँग्रेसला उतरती कळा आली होती. मात्र, देशमुखांच्या घरवापसीने काँग्रेसचा हात 'बळकट' होणार आहे.

रणजितसिंह देशमुखांवर आमच्याकडून अन्याय झाला, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे. रणजितसिंह हे अत्यंत तडफेने काम करणारे नेते आहेत. आपण तीन पक्ष सत्तेत आहोत, त्यातून पक्ष बळकट करायचा आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांचे हात बळकट करायचे आहेत, असं सूचक विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

रणजितसिंह देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेची धाकधूक वाढली आहे. जयकुमार गोरे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माण-खटाव विधानसभा मतदारसंघात पक्षाचे नुकसान झाले होते. आता रणजितसिंह हे स्वगृही परतल्याने काँग्रेसची ताकद आणखी वाढणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. रणजितसिंह देशमुख यांच्या पक्ष प्रवेशामुळे माण-खटाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष, तसेच सातारा जिल्ह्यातही काँग्रेस पक्ष उभारी घेईल, असा विश्वास जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमधून उमटत आहे. काही दिवसांपूर्वी कऱ्हाडात देखील आपापसातील मतभेद विसरुन विलासकाका उंडाळकारही स्वगृही परतल्याने कऱ्हाडात देखील काँग्रेसची ताकद वाढणार असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाला बळ मिळणार आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya