ओबीसी आरक्षण बचावासाठी यापुढे या रस्त्यावरची लढाई सुरू करणार - ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांचे आवाहन

 

स्थैर्य, फलटण, दि.१२: महाराष्ट्र राज्यात ज्या पद्धतीने मराठा समाजाचा आरक्षणाचा गदारोळ सुरू आहे. ते पाहता मराठा समाजाचे ओबीसीकरण कसल्याही परिस्थितीत होऊ नये याकरिता सर्व ओबीसी समाजाने एकत्रित येऊन भविष्यात ओबीसीच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी रस्त्यावरची लढाई करावी लागणार असल्याचे प्रतिपादन ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केले आहे.

ते मुंबई येथील मराठी पत्रकार भवनमध्ये येथे आयोजित केलेल्या ओबीसी समाजाच्या गोलमेज परिषदेमध्ये बोलत होते. या प्रसंगी ओबीसी भटके विमुक्त जाती जमाती कल्याणमंत्री मा.ना.श्री. विजय वडेट्टीवार, अहिल्या ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारस्कर, बापट आयोगाचे सदस्य भटक्या समाजाचे नेते लक्ष्मणराव गायकवाड, बाळासाहेब सानप, मच्छिंद्र कांबळे, पल्लवी ताई रेणके, प्रा. बी.डी. चव्हाण, महेश भाट, गजेंद्र भोसले, बंजारा समाजाचे अध्यक्ष प्रकाश राठोड, विश्वास दोर्वेकर, भटक्या जाती जमातीचे नेते साहित्यिक मच्छिंद्र भोसले, बालाजी शिंदे, बंजारा क्रांती दलाच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ. उषाताई राठोड, राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाच्या प्रियंका ताई राठोड, महेश भाट प्राध्यापक विलास काळे, अरुण खरमाटे, बाळासाहेब सानप, डॉ. न्याज्ञेश्वर गोरे, सुनील ढोले पाटील, मधुशेठ भोईर इत्यादी मान्यवर सह ओबीसी अंतर्गत विविध समाजाचे प्रमुख नेते मंडळी यांची गोलमेज परिषदेतला उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पुढे प्रकाश शेंडगे म्हणाले की, भविष्यात ओबीसी समाजाच्या आरक्षणावर खूप मोठे संकट येण्याची शक्यता असून याचा मुकाबला करण्यासाठी ओबीसी अंतर्गत येणाऱ्या सर्व जाती, जमातींनी, भटक्या विमुक्त,बलुतेदार, आलुतेदार यांनी एकत्रित येऊन ओबीसीची वज्रमूठ करून लढाईस सज्ज झाले पाहिजे तसेच ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे, ओबीसी अंतर्गत येणाऱ्या महा ज्योती या संस्थेस भरघोस निधी प्राप्त झाला पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप वेळेत झाले पाहिजे अशा विविध मागण्या ओबीसी समाजाच्या प्रलंबित आहेत त्या तात्काळ मार्गे लावण्यात याव्यात त तसेच ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी वेळप्रसंगी कितीही मोठी किंमत मला मोजावी लागली तरी मी मागे पुढे पाहणार नाही. असे सांगून पुढे शेंडगे म्हणाले की, मला माहित आहे की ओबीसी समाजाचे संघटन बांधण्यासाठी व ओबीसी समाज एकत्रित करण्याकरीता आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले त्यांना त्यांना संपविण्यात आले आहे.हे मला माहित आहे.असेही प्रकाश शेंडगे शेवटी म्हणाले.

मुंबई फोर्ट, येथील मुंबई मराठी पत्रकार संघ सभागृहामध्ये राज्यस्तरीय ओबीसी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या गोलमेज परिषदेमध्ये ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांचा ठराव करून या मागण्या शासन दरबारी देण्यात आल्या‌.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya