भारतीय जवानांना सॅल्यूट! सुटीवर आलेल्या जवानांकडून सटालेवाडीत 'देशसेवा'

 

स्थैर्य, सायगाव, दि.१२: भारतीय सैन्यदलातून महिन्याच्या सुटीवर आलेले जवान छत्रसाल कदम व तुषार ओंबळे यांनी सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांना प्रशिक्षण देत आपल्या सुटीतही एक प्रकारे देशसेवाच करत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

सटालेवाडी (पो. परकंदी, ता. वाई) येथील छत्रसाल कदम हे सैन्यदलात झांसी (उत्तर प्रदेश) येथे टेक्‍निशियन इन टेली कम्युनिकेशन पदावर, तर तुषार ओंबळे हे लेह येथे सेवा करत आहेत. जयहिंद फाउंडेशनचे ते सभासद आहेत. नुकतेच हे दोघे महिन्याच्या सुटीवर आले आहेत. मात्र, सुटीवर आल्यापासून त्यांनी आपला रिकामा वेळ मोबाईल, सोशल मीडियासारख्या गोष्टींत न घालवता या वेळेचा सदुपयोग करत परिसरातील सैन्यभरती प्रक्रियेत असणाऱ्या युवकांना दररोज सकाळ, संध्याकाळ भरतीपूर्व प्रशिक्षण देत आहेत. त्यामध्ये फिजिकल फिटनेस कशा पद्धतीने मेंटेन केला पाहिजे, तसेच इतर व्यायाम या मुलांकड़ून करून घेत आहेत. 

पहाटे साडेपाच ते सातपर्यंत व्यायाम, तर रविवारी फुटबॉल व ट्रेकिंग, आठवड्यातून एकदा मंदिर किंवा परिसर साफसफाई केली जाते. सर्व तरुण मुलांचे व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार करून एमपीएस व युपीएस परीक्षेचे मार्गदर्शन केले जात आहे. दरम्यान, परिसरातील सुटीवर येणाऱ्या प्रत्येक जवानाने असे मुलांना प्रशिक्षण दिले तर जास्तीत जास्त तरुण मुले सैन्यात भरती होतील, यात कसलीच शंका नाही, असे जयहिंद फाउंडेशनचे राष्ट्रीय सचिव हनुमंत मांढरे यांनी सांगितले.