पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

 

स्थैर्य,पुणे, दि.२१: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील काही ठिकाणच्या शाळा सुरु करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरु झाल्या आहे. मात्र कोरोना संसर्गाची स्थानिक परिस्थिती पाहून तेथील शाळा उघडण्याबाबतचा निर्णय जिल्हा प्रशासनावर सोपवला होता. पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिका आणि खासगी शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.

पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महापालिका आणि खासगी शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 13 डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा आणि पालकांशी चर्चा करुन आणि सद्यस्थिती लक्षात घेऊनच शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ असे महापौर मोहोळ यांनी सांगितले. याआधी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

औरंगाबाद जिल्ह्यात शाळा सुरू होणार

राज्य सरकारच्या आदेशाची औरंगाबादेत अंमलबजावणी होणार असून ग्रामीण भागातील शाळा येत्या सोमवारपासूनच सुरू होणार आहेत. मात्र औरंगाबाद शहरातील शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.