बिहार निवडणुकीत शिवसेनेच्या हाती ‘भोपळा’

 

स्थैर्य, मुंबई, दि.१०: बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मोठा गाजावाजा करत या निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली. पण, कुठेही सेनेची ‘तुतारी’ वाजली नाही. शिवसेनेला भोपळाही फोडता आलेला नाही.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून बिहार सरकार विरुद्ध ठाकरे सरकार असा सामना रंगला होता. याच दरम्यान, शिवसेनेनं बिहार विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. निवडणूक आयोगाने सेनेला बिस्कीट हे चिन्ह सुद्धा दिले होते. पण, निवडणूक आयोगाने ‘बिस्कीट’ चिन्ह दिल्यामुळे शिवसेना नाराज झाली होती. त्यामुळे शिवसेनेनं आयोगाकडे चिन्ह बदलून द्यावी अशी विनंती केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेची मागणी मान्य करत ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे चिन्ह दिले होते.

शिवसेनेनं बिहार विधानसभा निवडणुकीत 50 जागा लढवण्याची तयारी केली होती. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूने आक्षेप घेतला होता. ‘शिवसेना स्थानिक राजकीय पक्ष नाही. तसंच शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचे आमच्या चिन्हाशी साधर्म्य असल्याने मतदारांचा गोंधळ होता. आमची मते शिवसेनेला जातात असा जदयूचा आक्षेपचा मुद्दा होता. निवडणूक आयोगाने तो मुद्दा ग्राह्य ठरवत शिवसेनेला निवडणुकीसाठी धनुष्यबाणाऐवजी दुसरे चिन्ह दिले.