वाईजवळ दोन सराईत चोरटे जेरबंद; एलसीबीची कारवाई, 1.60 लाखांचा ऐवज हस्तगत

 

स्थैर्य, सातारा, दि.१३: वाई शहरानजिकच्या बावधन नाका परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून घरफोडी करणार्‍या दोन सराईत चोरट्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून 1 लाख 60 हजारांचा सोन्या-चांदीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. 

याबाबत माहिती अशी, वाई शहरामध्ये दोन संशयीत चोरीचे सोन्याचे दागिने विक्रीसाठी येणार आहेत, अशी खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला लागली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाई शहरातील बावधन नाका परीसरामध्ये सापळा लावला. त्याठिकाणी संबंधित दोन संशयीत इसम मिळुन आल्याने त्यांना पकडुन त्यांचेकडे विचारपुस केली. यावेळी त्यांनी सुमारे 10 महिन्यांपुर्वी वाई एस.टी.स्टॅण्डचे मागील बाजुच्या दत्तनगर परीसरामध्ये घरफोडी चोरी केल्याचे कबुली दिली. तसेच या घरफोडी चोरीतील सोन्याचे दागिने वाई शहरामध्ये विक्री करण्याकरीता आणल्याचेही सांगितले. यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्याकडून सोन्याचे गंठण, कानातील टॉप व कानातील वेल असे रुपये 1 लाख 61 हजार 500 रुपयांचे दागिने हस्तगत केले. याबाबत पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता सुमारे 10 महिन्यांपुर्वी दत्तनगर वाई भागात घरफोडी चोरी झाली होती. त्याबाबत वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडुन उघडकीस आणला असुन संशयीतांना वाई पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आलेले आहे. 

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकातील सहायक पोलीरस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या सुचनेप्रमाणे सहायक फौजदार ज्योतिराम बर्गे, उत्तम दबडे, हवालदार संतोष सपकाळ, पो.ना.रविद्र वाघमारे, प्रवीण कांबळे, पो.कॉ.वैभव सावंत, मोहसीन मोमीन चालक पो.ना.संजय जाधव, विजय सावंत, निवृत्ती घाडगे आदींनी केली.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya