खंबाटकी घाटात मुंबईहून महाबळेश्वरला जाणा-या गाडीला आग; लाखोंचे नुकसान

 

स्थैर्य, वाई, दि.१८ : पुणे-बंगळूर महामार्गावर खंबाटकी घाट उतरत असताना मुंबईहुन महाबळेश्वरकडे जाणाऱ्या मोटारीने अचानक पेट घेतला. मोटार पेट घेत असल्याचे लक्षात येताच त्यातील दोघेजण लगेचच बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत संपूर्ण मोटार जळून खाक झाली. 

मंगळवारी रात्री मुंबईहून वाईमार्गे महाबळेश्वर जाणारी मोटार खंबाटकी घाट उतरत एका वळणावर आली असता, गाडीने अचानकपणे पेट घेतला. कार पेटल्याचे लक्षात आल्यावर गाडी चालकाने ती कार रस्त्याच्या एका बाजूस उभी केली. कारमधील दोघेही तत्काळ बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. दोघेही मुंबईहून वाईहुन महाबळेश्वर जात होते. या पेटलेल्या मोटारमुळे रस्त्याकडेचे झाडही पेटले गेले. त्यामुळे अपघात स्थळी आगीचे व धुराचे लोट निर्माण झाले.

याबाबतची माहिती मिळताच वेळे ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसही पोहोचल्यावर घाटातील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली. किसनवीर साखर कारखाना व वाई पालिकेचे अग्निशामक बंबाने ही आग विझविली. या आगीत गाडी संपूर्णतः जळून खाक होवून, लाखो रुपयांचे नुकसान झाले.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya