औंध संगीत महोत्सव यशस्वीरीत्या पार

 


स्थैर्य, औंध, दि.२२: कोरोनामुळे अश्विन वद्य पंचमीला यंदा संगीत महोत्सवाचे आयोजन न करता आँनलाईन पध्दतीने आज घेण्यात आला. त्याकरिता शिवानंदच्या फेसबुकपेज आणि युट्युबवरुन कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. कार्यक्रम आँनलाईन असला तरी रसिक श्रोत्यांनी त्याला भरभरून दाद देत शास्त्रीय संगीताचा आनंद लुटला.

सकाळी दहा वाजता बैठकीला सुरवात झाली.

उत्सवातील पहिल्या सत्राचा यज्ञेश रायकर युवा कलाकाराने ताबा घेतला. त्यांनी गानसरस्वती किशोरी आमोनकर यांच्याकडून संगीताचे धडे घेतले आहेत. व्हायोलिन वर ललत पंचम या रागाने सुरवात केली. त्यामध्ये उडत बूंदन आणि छेलना रंग डाल या दोन बंदिशींचे दमदारपणे सादरीकरण केले.त्यानंतर स्वरचित एकताल मधील एक गत पेश केली. ताल सुरांची उधळण सुरू झाल्यामुळे श्रोत्यांच्यात उत्साह संचारला. शेवटी मिश्र खमाज मधील धून वाजवून आपले वादन त्यांनी संपवले.त्यांना तबल्यावर विश्वनाथ शिरोडकर यांनी साथ केली.
त्यानंतर पंडित अरविंद मुळगांवकर यांचे ज्येष्ठ शिष्य तालशिरोमणी किताबाचे मानकरी आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार विश्वनाथ जोशी यांचे एकल तबला वादन पेश झाले. तबल्यावर सफाईदारपणे फिरणाऱ्या बोटावर त्यांनी स्वरांना बोलते केले. ताल तबलावादनात त्यांनी ताल तीनताल सादर केला.त्यांना लेहरा साथ सिद्धेश बीचोलकर यांनी केली.

बाराच्या सुमाराला तापमान वाढत चालले असले तरी बरसणाऱ्या सप्तसुरांमुळे हवेत संगीताची शितल छाया पसरली होती. सकाळच्या सत्राची सांगता ललित कला केंद्र,पुणे येथे गुरू म्हणून कार्यरत असलेले विश्वेश सरदेशपांडे यांच्या गायनाने झाली. ग्वाल्हेर घराण्याचे गायक केदार बोडस यांचेकडे गायकिचे धडे घेत आहेत. त्यांनी राग जौनपुरी मध्ये मध्यलय झपतालात गुनीजन सब मिल व त्याला जोडून द्रुत तीनताल मध्ये गुरु की सेवा जो करे या बंदिशी सादर केल्या व आपल्या गायनाची सांगता राग गौड़सारंग रागातील मध्यलय तीनताल मधील पारंपरिक परो नहीं मोरे पैयां बंदिशीने केली.

त्यांना तबल्यावर पुष्कर महाजन व हार्मोनियम सौमित्र क्षीरसागर यांनी साथ केली.